अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर
वृत्तसंस्था / गोल्डकोस्ट
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या अॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. मेरनूस लाबुसेनचे संघात पुनरागमन झाले आहे. अॅशेस मालिकेतील पहिली कसोटी 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पर्थ येथे खेळविली जाईल.
या मालिकेसाठी 31 वर्षीय जॅक विथराल्ड या नव्या चेहऱ्याला निवड समितीने संधी दिली आहे. मॅट रेनशॉ आणि सॅम कोन्स्टास यांना निवड समितीने प्राधान्य दिले नाही. गेल्या उन्हाळी मोसमात झालेल्या शेफील्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत विथराल्डने 50.33 धावांच्या सरासरीने 906 धावा जमवित निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. ऑस्ट्रेलियन संघाचा नियमीत कर्णधार पॅट कमिन्स हा अद्याप दुखापतीच्या समस्येतून पूर्णपणे बरा झाला नसल्याने आता स्टिव्ह स्मिथकडे कप्तानपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याची जबाबदारी प्रामुख्याने स्टार्क, हॅजवूड आणि बोलँड यांच्यावर राहील. दरम्यान डॉगेट आणि अॅबॉट हे पर्यायी गोलंदाज राहतील. अष्टपैलु वेबस्टर आणि ग्रीन यांनी आपले स्थान कायम राखले आहे. पाच सामन्यांच्या अॅसेस मालिकेसाठी इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्स करणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ: स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अॅबॉट, बोलँड, कॅरे, डॉगेट, ग्रीन, हॅजलवूड, हेड, इंग्लीस, उस्मान ख्वॉजा, लाबूसेन, लियॉन, स्टार्क, विथराल्ड आणि वेबस्टर.