ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका ‘डब्ल्यूटीसी’ फायनल आजपासून
पहिले जेतेपद पटकावण्यास द.आफ्रिका सज्ज तर जेतेपद राखण्याचे कांगारूंचे प्रयत्न
वृत्तसंस्था/ लंडन
जागतिक कसोटी स्पर्धेची अंतिम लढत आज बुधवारपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळविली जाणार आहे. फक्त ऑस्ट्रेलियानेच पुऊषांचे चारही जागतिक चषक जिंकले असून अंतिम फेरीत त्यांना हरवणे नेहमीच कठीण राहिलेले आहे. 50 षटकांच्या सामन्यांचा विश्वचषक, टी-20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील 13 पैकी 10 अंतिम सामने त्यांनी जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ तटस्थ ठिकाण असलेल्या लॉर्ड्सवरील फायनलमध्ये 11 व्या जागतिक विजेतेपदासाठी उतरेल. ऑस्ट्रेलियाने सर्वांत मोठ्या टप्प्यांवर दणदणीत कामगिरी करून दाखविलेली आहे, तर दक्षिण आफ्रिकेचे अगदी उलटे असून ते या स्तरावर नेहमीच कमी कामगिरी करणारा संघ राहिलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 1998 मध्ये फक्त एकच प्रमुख विजेतेपद जिंकलेले आहे आणि ते चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आहे. सध्याच्या संघातील खेळाड तेव्हा लहान होते. या अनुभवी संघाचे सरासरी वय 29.5 असून एकमेकांच्या पाठीमागे उभे राहण्याचा त्यांचा दृढनिश्चय एक असा बंध निर्माण करतो, ज्याला कमी लेखता येणार नाही.
2023-25 च्या जागतिक क्रिकेट स्पर्धेत हे अनेकदा दिसून आले आहे. कारण दक्षिण आफ्रिकेने इतर कोणत्याही संघापेक्षा जास्त म्हणजे 30 खेळाडूंचा वापर केलेला असून त्यांना योग्य वेळी धावा करणारा किंवा बळी घेणारा खेळाडू सापडलेला आहे. त्यांनी त्यांचे मागील सात कसोटी सामने जिंकले आहेत आणि अंतिम फेरीसाठी ते सर्वप्रथम पात्र ठरले. दुसरीकडे, 2023 च्या अंतिम सामन्यात ओव्हलमध्ये भारताला 209 धावांनी हरविणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे खूप अनुभवी खेळाडूंचा चमू आहे. त्या अंतिम सामन्यात खेळलेल्या 11 पैकी दहा जण या संघात आहेत. फक्त डेव्हिड वॉर्नर अनुपस्थित आहे, जो कसोटीतून निवृत्त झाला आहे.
मध्यमगती गोलंदाज जोश हेझलवूड त्यावेळी दुखापतग्रस्त झाला होता आणि खेळला नव्हता, परंतु 2023 च्या स्टार खेळाडूंपैकी एक स्कॉट बोलँडची जागा तो घेण्याची अपेक्षा आहे. हेझलवूडने खांद्याच्या दुखापतीवर मात करून 12 डावांमध्ये 22 बळी घेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला पहिले इंडियन प्रीमियर लीग जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. सलामीवीर म्हणून वॉर्नरची जागा कायमस्वरुपी घेणारा खेळाडू अद्याप निश्चित झालेला नाही. सॅम कोन्स्टासने डिसेंबरमध्ये 19 व्या वर्षी भारताविऊद्ध पदार्पण केले होते, परंतु फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेत ट्रॅव्हिस हेडला पसंती देण्यात आली होती. ते या जागेचे मुख्य दावेदार असल्याचे दिसते.
2016 पासून मार्नस लाबुशेन फक्त एकदाच आघाडीला आलेला आहे आणि त्याचा फॉर्म घसरला आहे. तो चिंतेचा विषय असून जागतिक कसोटी स्पर्धेत त्याची सरासरी फक्त 28.33 राहिलेली आहे. गेल्या महिन्यात इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या विभागात ग्लेमॉर्गनतर्फे खेळताना फॉर्म मिळविण्याचे त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. कंबरेच्या खालच्या भागावरील शस्त्रक्रियेतून सावरत अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनने त्याच विभागात ग्लॉस्टरशायरसाठी तीन शतके झळकावली. पण तो गोलंदाजी करण्यास तयार नाही. असे असले, तरी त्याने कदाचित काही फरक पडणार नाही. कारण ऑस्ट्रेलियाकडे बळी मिळविण्याच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या त्यांच्या सर्वकालीन 10 खेळाडूंपैकी चार सध्या हाताशी आहेत. त्यात नॅथन लायन (553 बळी, तिसरे स्थान), मिचेल स्टार्क (382 बळी, चौथे स्थान), कर्णधार पॅट कमिन्स (294 बळी, आठवे स्थान) आणि हेझलवूड (279 बळी, 10 वे स्थान) यांचा समावेश होतो.
स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ गेल्या आठवड्यात 36 वर्षांचा झाला आहे आणि कोन्स्टास, सलामीवीर उस्मान ख्वाजा, लिऑन, बोलँड आणि यष्टिरक्षक अॅलेक्स केरी यांच्याप्रमाणे तो मार्चपासून वरिष्ठ स्तरावर खेळलेला नाही. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा कसे बदलायचे याचे ज्ञान या साऱ्यांकडे आहे. स्मिथने त्याच्या मागील पाच कसोटींमध्ये चार शतके केली आहेत आणि त्याने कारकिर्दीतील 10,000 धावा पूर्ण केल्या आहेत. लॉर्ड्सवर त्याची सरासरी 58 इतकी राहिलेली आहे.
ख्वाजासोबत जो कोणी सलामीला येईल त्याला दक्षिण आफ्रिकेचा घातक वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याचा सामना करावा लागेल. ख्वाजा पूर्ण ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करेल. तो 10 सामन्यांत पाच वेळा रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. 327 बळींसह रबाडा दक्षिण आफ्रिकेच्या सर्वकालीन सर्वोत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर असलेल्या अॅलन डोनाल्डची बरोबरी करण्यापासून केवळ तीन बळींनी दूर आहे. रबाडासोबत डावखुरा गोलंदाज मार्को जॅनसेन असेल, ज्याने या जागतिक कसोटी स्पर्धेत सहा सामन्यांत 29 बळी घेतले आहेत. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून आयपीएलमधील आठ दक्षिण आफ्रिकी खेळाडूंपैकी एक असलेला लुंगी एनगिडी किंवा काउंटीत मिडलसेक्ससाठी गोलंदाजी करणारा डेन पॅटरसन यांच्यापैकी एकटा खेळेल.
दक्षिण आफ्रिकेने सलामीवीर म्हणून एडेन मार्करम आणि रायन रिकेलटन येतील आणि चौथ्या क्रमांकावर कर्णधार बावुमा येईल याची पुष्टी केली आहे. ते आयपीएलमध्येही खेळले. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज राहिलेला मधल्या फळीतील डेव्हिड बेडिंगहॅम याने झिम्बाब्वेविऊद्धच्या सराव सामन्यातून सिद्ध केले आहे की, तो एप्रिलमध्ये पायाच्या बोटाला झालेल्या दुखापतीतून सावरला आहे.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार.