सामना ऑस्ट्रेलिया-स्कॉटलंडचा, धोका इंग्लंडला
वृत्तसंस्था/ ग्रॉस आयलेट (सेंट लुसिया)
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील ‘ब’ गटातील आज रविवारी होणाऱ्या महत्त्वाच्या लढतीत स्कॉटलंडच्या धोक्यापासून ऑस्ट्रेलियाला सावध राहावे लागेल. असे असले, तरी या सामन्याच्या निकालापासून जास्त धोका इंग्लंडला आहे. कारण ऑस्ट्रेलियाने आधीच ‘ब’ गटातून सुपर एटमधील आपले स्थान निश्चित केले आहे, तर स्कॉटलंड आणि इंग्लंड दुसऱ्या स्थानासाठीच्या शर्यतीत आहेत.
स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियाला हरवल्यास किंवा सामना पावसात वाहून गेल्यास स्कॉटिश संघ सुपर एटसाठी पात्र ठरू शकतो. परंतु मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील संघाकडून पराभव झाल्यास स्कॉटलंडला ती संधी हुकण्याची शक्यता आहे. तशा परिस्थितीत इंग्लंडचे भाग्य उजळू शकते. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या अव्वल फॉर्ममध्ये आहे. नॅथन एलिस त्यांच्या संघात आजही झळकण्याची अपेक्षा आहे. कारण अशा सामन्यात पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क या तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एकाला विश्रांती देण्याकडे नेहमी ऑस्ट्रेलियाचा कल राहिलेला आहे.
हेझलवूडने यापूर्वी इंग्लंडच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडविऊद्धच्या त्यांच्या दृष्टिकोनात बदल केल्याचा उल्लेख केला होता. परंतु जोस बटलरच्या संघाने ओमानवर विजय मिळविताना त्यांच्या ‘नेट रन रेट’मध्ये प्रचंड सुधारणा करून चित्र बदलले आहे. स्कॉट्स आज आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करतील यात शंका नाही. पाऊस कृपा करेल अशीही आशा ते बाळगून राहू शकतात. कारण ते इंग्लंडच्या तीन गुणांच्या तुलनेत पाच गुणांसह अद्याप गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत.
सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)
पाकिस्तानसमोर आयर्लंडचे आव्हान
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान फ्लोरिडामधील लॉडरहिल येथे आज रविवारी होणाऱ्या ‘अ’ गटातील त्यांच्या अंतिम सामन्यात आयर्लंडवर विजय मिळवून काही प्रमाणात प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि अमेरिकेने ‘अ’ गटातून ‘सुपर एट’ टप्प्यातील दोन स्थानांवर शिक्कामोर्तब केल्यामुळे पाकिस्तानपुढे आत्मपरीक्षण करण्याशिवाय आणखी दुसरे काम राहिलेले नाही. पण त्याआधी बाबरच्या संघाला आयरिश आव्हान हाणून पाडावे लागेल. आयर्लंडने टी-20 विश्वचषकापूर्वी झालेल्या लढतीत पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यामुळे दोन्ही संघातील ही लढत रंगण्याची शक्यता आहे.
आयर्लंड हा असा एकमेव संघ आहे ज्याला ‘अ’ गटात विजय मिळवता आलेला नाही. पण पाकिस्तानचा आत्मविश्वासाचा अभाव आणि निर्णायक टप्प्यावर अपयशी ठरण्याचे त्यांचे वैशिष्ट्या पाहता विजयाने आपली मोहीम संपविण्याची आशा आयरिश संघ बाळगू शकतो. पण गेल्या काही दिवसांत फ्लोरिडामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने या सामन्यावर पावसाचे सावट राहणार आहे.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)