महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन

06:58 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंतिम लढतीत टीम इंडियाचे वाघ ढेपाळले : कांगारुंचा भारतावर 79 धावांनी विजय : सहाव्या जेतेपदापासून भारत वंचित :

Advertisement

वृत्तसंस्था/ बेनोनी, द.आफ्रिका

Advertisement

गतवर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला वरिष्ठ ऑस्ट्रेलियन संघाने  फायनलमध्ये दणका दिल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच ज्युनिअर ऑस्ट्रेलियन संघाने देखील फायनलमध्ये युवा भारतीय संघाचा धुव्वा उडवला. 254 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 174 धावांमध्ये गुंडाळला गेला. बिअर्डमॅन आणि मॅकमिलनने प्रत्येकी तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आठव्या क्रमांकावर आलेल्या मुरूगन अभिषेकने 42 धावांची खेळी करून काही काळ संघर्ष केला, पण अपेक्षित साथ मिळाली नाही.

ऑस्ट्रेलियाने अंतिम लढतीत 79 धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली आहे. या पराभवासह भारतीय संघाचे सहावे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ संघाप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या युवा संघाने देखील अंतिम लढतीत शानदार खेळाचे प्रदर्शन साकारले.

भारतीय वंशाच्या हरजस सिंगची महत्वपूर्ण खेळी

या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावातील चौथ्या षटकात सलामीचा कोनस्टेस खाते उघडण्यापूर्वीच लिंबानीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर डिक्सन आणि कर्णधार वेबगेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 78 धावांची भागिदारी केली. कर्णधार वेबगेनने 66 चेंडूत 5 चौकारांसह 48 तर सलामीच्या डिक्सनने 56 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 42 धावांचे योगदान दिले. भारताच्या नमन तिवारीने या जोडीला लागोपाठ बाद केले. यानंतर भारतीय वंशाच्या हरजस सिंग व रेयॉन हिक्सने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या जोडीने  चौथ्या गड्यासाठी 66 धावांची भर घातली. हरजस सिंगने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने 64 चेंडूंचा सामना करत 55 धावा केल्या. हरजसच्या या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. यामुळे ऑस्ट्रेलियाला दोनशेचा टप्पा पार करता आला. हिक्सने 20 धावा करत त्याला चांगली साथ दिली.  हिक्सला वेगवान गोलंदाज राज लिंबानीने बाद केले. तर हरजस सिंग फिरकीपटू सौमी पांडेचा बळी ठरला. यानंतर ऑलिव्हर पिकेने समायोचीत फलंदाजी करत शेवटच्या 10 षटकात अँडरसन समवेत सातव्या गड्यासाठी 34 धावांची भागिदारी केल्याने ऑस्ट्रेलियाला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. पिकेने 43 चेंडूत नाबाद 46 धावा फटकावल्या. स्टॅकर 8 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले तर नमन तिवारीने 2 बळी घेतले. याशिवाय सौम्या पांडे आणि मुशीर खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

वरिष्ठ संघाप्रमाणे युवा संघ अंतिम फेरीत ढेपाळला

गेल्यावर्षी झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम फेरीमध्ये धडक दिली होती. मात्र, अंतिम फेरीमध्ये कचखाऊ फलंदाजीमुळे वर्ल्डकप गमवावा लागला होता. यानंतर उदय सहारनच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने शानदार कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र सिनिअर टीम इंडियाची जी अवस्था वरिष्ठ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झाली तीच अवस्था ज्युनियर टीम इंडियाची अवस्था आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली.

254 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर अर्शिन कुलकर्णी अवघ्या तीन धावांवर तिसऱ्या षटकात बाद झाला. यानंतर आलेल्या मुशीर खानने सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला एक जीवदान मिळून सुद्धा मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो अवघ्या 22 धावांवरती बाद झाला. त्यानंतर आलेला कॅप्टन उदय सहारन आणि बीडचा हुकमी एका सचिन धस, प्रियांशु मोलिया, अविनाश हे स्टार फलंदाज लागोपाठ झाल्याने टीम इंडियाची 6 बाद 91 अशी स्थिती झाली होती. सलामीवर आदर्श सिंगने सर्वाधिक 77 चेंडूत 47 धावांचे योगदान दिले. तर तळाचा फलंदाज मुरुगन अभिषेकने 46 चेंडूत 42 धावा करत शेवटच्या क्षणी चांगली लढत दिली. पण ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने भारताचा डाव 43.5 षटकांत 174 धावांवर संपला.

 

संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया 50 षटकात 7 बाद 253 (डिक्सन 42, वेबगेन 48, हरजस सिंग 55, हिक्स 20, ऑलिव्हर पिके 46, अँडरसन 13, स्ट्रेकर नाबाद 8, मॅकमिलन 2, अवांतर 19, लिंबानी 3-38, नमन तिवारी 2-63, पांडे 1-41, मुशीर खान 1-46).

भारत 43.5 षटकांत सर्वबाद 174 (आदर्श सिंग 47, मुशीर खान 22, एम अभिषेक 42, मॅकमिलन व बिअर्डमॅन प्रत्येकी तीन बळी).

ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा चॅम्पियन, भारताला उपजेतेपद

अंडर 19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये रविवारी रात्री ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची कामगिरी केली आहे. याआधी कांगारुंनी 1988, 2002, 2010 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. यंदा त्यांनी अंतिम लढतीत शानदार खेळाचे प्रदर्शन साकारत चौथ्यांदा जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ हा अंडर 19 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कपवर कब्जा केला होता. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये भारत उपविजेता ठरला आहे. दरम्यान, पाचवेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाला यंदा मात्र उपजेतेपदावर समाधान मानावे लागले.

भारताच्या जेतेपदाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचा पुन्हा अडथळा

भारतीय संघाने 19 वर्षांखालील वनडे विश्वचषकात एकही पराभव न स्वीकारता अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. पण अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे जागतिक स्पर्धेतील महत्वाच्या स्पर्धेच्या जेतेपदाच्या मार्गात ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा आडवा आला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वरिष्ठांचा वनडे वर्ल्डकप आणि आता युवा वर्ल्डकप स्पर्धेत भारताला पुन्हा एकदा कांगारुंकडून हार पत्कारावी लागली. या पराभवामुळे आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article