ऑस्ट्रेलियाची वाटचाल मालिका विजयाकडे
लंकेला 54 धावांची आघाडी, जयसुर्याचे 5 बळी, मॅथ्युजचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ गॅले
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर बलाढ्या ऑस्ट्रेलियन संघ मालिका विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. लंकेने दिवसअखेर दुसऱ्या डावात 8 बाद 211 धावा जमवित 54 धावांची आघाडी मिळविली आहे. मॅथ्युजने दमदार अर्धशतक झळकविले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जयसुर्याने 5 गडी बाद केले.
या मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने केवळ दोन दिवसांत जिंकताना लंकेचा फॉलोऑन देवून डावाने पराभव केला होता. या दुसऱ्या कसोटीत लंकेने पहिल्या डावात 257 धावा जमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 330 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचा डाव 414 डावांवर आटोपला. जयसुर्याच्या अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे 7 गडी 84 धावांची भर घालत तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये स्मिथने 1 षटकार आणि 10 चौकारांसह 131 तर कॅरेने 2 षटकार आणि 15 चौकारांसह 156 धावा जमविल्या. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 259 धावांची द्विशतकी भागिदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर लंकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे तळाचे फलंदाज झटपट गुंडाळले. वेबस्टरने 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. प्रभात जयसुर्याने 151 धावांत 5 तर पेरीसने 94 धावांत 3 आणि रमेश मेंडीसने 81 धावांत 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात लंकेवर 157 धावांची भक्कम आघाडी मिळविली.
उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपुष्टात आला. त्यानंतर लंकेने आपल्यहा दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि चहापानापर्यंत 33 षटकात 4 बाद 98 धावा जमविल्या होत्या. निशांका 8 तर करुणारत्ने 14 आणि चंडीमल 12 धावांवर बाद झाले. कमिंदु मेंडीसने 14 धावांचे योगदान दिले. लंकेच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे लियॉन आणि कुहेनमन यांची गोलंदाजी प्रभावी ठरली. अॅन्जेलो मॅथ्युजने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करताना 149 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 76 धावा जमविल्या. धनंजय डिसिल्वाने 4 चौकारासह 23 धावा जमविताना पाचव्या गड्यासाठी मॅथ्युज समवेत 47 धावांची भर घातली. कुहेनमनने डिसिल्वाला झेलबाद केले. लियॉनच्या गोलंदाजीवर मॅथ्युज झेलबाद झाला. रमेश मेंडीस खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. प्रभात जयसुर्या 6 धावांवर बाद झाला. कुशल मेंडीस 1 षटकार आणि 5 चौकारांसह 48 धावांवर खेळत आहे. जयसुर्या तिसऱ्या दिवशीच्या खेळातील शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पंचांनी खेळ थांबविला. त्यावेळी लंकेने 62.1 षटकात 8 बाद 211 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे कुहेनमनने 52 धावांत 4 तर लियॉनने 80 धावांत 3 आणि वेबस्टरने 1 गडी बाद केले. लंकेच्या पहिल्या डावात कुहेनमन आणि लियॉन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले होते. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून रविवारी ऑस्ट्रेलियन संघ विजय नोंदवेल, असा अंदाज आहे.
संक्षिप्त धावफलक: लंका प. डाव 257, ऑस्ट्रेलिया प. डाव 106.4 षटकात सर्वबाद 414 (स्मिथ 131, कॅरे 156, ख्वाजा 36, हेड 21, वेबस्टर 31, अवांतर 15, जयसुर्या 5-151, पेरीस 3-94, रमेश मेंडीस 2-81), लंका दु. डाव 62.1 षटकात 8 बाद 211 (मॅथ्युज 76, कुशल मेंडीस खेळत आहे 48, डिसिल्वा 23, करुणारत्ने 14, कमिंदु मेंडीस 14, चंडीमल 12 अवांतर 10, कुहेनमन 4-52, लियॉन 3-80, वेबस्टर 1-6)