ऑस्ट्रेलियाचा भारतावर तीन धावांनी निसटता विजय
घोषचे अर्धशतक वाया, लिचफिल्ड, पेरी यांची अर्धशतके, सुदरलँडचे तीन बळी
वृत्तसंस्था/ मुंबई
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने यजमान भारताचा केवळ 3 धावांनी पराभव करत मालिका हस्तगत केली. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 259 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारताने 50 षटकात 8 बाद 255 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीची लिचफिल्ड आणि इलिसी पेरी यांनी अर्धशतके झळकविली. भारताच्या दिप्ती शर्माने 38 धावात 5 गडी बाद केले. भारताच्या डावात रिचा घोषचे शतक 4 धावांनी हुकले. ऑस्ट्रेलियातर्फे सुदरलँडने 3 तर वेरहॅमने 2 गडी बाद पेले. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकून यापूर्वीच भारतावर आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या डावाला लिचफिल्ड आणि कर्णधार हिली यांनी सावध सुरूवात करताना 55 चेंडूत 40 धावांची भागिदारी केली. पूजा वस्त्रकरने हिलीचा त्रिफळा उडविला. तिने 2 चौकारांसह 13 धावा केल्या. त्यानंतर लिचफिल्ड आणि इलेसी पेरी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 77 धावांची भागिदारी केली. पेरीने 47 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 50 धावा जमविल्या. शर्माच्या गोलंदाजीवर ती झेलबाद झाली. दिप्ती शर्मान ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना बेथ मुनीला पायचीत केले. तिने 1 चौकारांसह 10 धावा केल्या. श्रेयांका पाटीलने लिचफिल्डला घोषकरवी झेलबाद केले. तिने 98 चेंडूत 6 चौकारांसह 63 धावा जमविल्या. मॅकग्राने 32 चेंडूत 2 चौकारांसह 24, सुदरलँडने 29 चेंडूत 1 चौकारांसह 23, गार्डनरने 2, वेरहॅमने 20 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 22, किंगने 17 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 28 तर गॅरेथने नाबाद 11 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 5 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे दिप्ती शर्माने 38 धावात 5 तर पूजा वस्त्रकर, श्रेयांका पाटील आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने 38 षटकाअखेर 4 बाद 183 धावांपर्यंत मजल मारली होती. यास्थिका भाटीया आणि स्मृती मानधना यांनी सलामीच्या गड्यासाठी 7 षटकात 37 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या गॅरेथने भाटीयाला पायचीत केले. तिने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या कींगने मानधनाला मॅकग्राकरवी झेलबाद केले. मानधनाने 38 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 34 धावा जमविल्या. रिचा घोष आणि रॉड्रिग्ज यांनी संघाला सुस्थितीत नेताना तिसऱ्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या वेरहॅमने रॉड्रिग्जला झेलबाद केले. तिने 55 चेंडूत 3 चौकारांसह 44 धावा झळकविल्या. रिचा घोषने आपले अर्धशतक 5 चौकारांच्या मदतीने 74 चेंडूत पूर्ण केले. रॉड्रिग्ज बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला आणखी एक धक्का देताना कर्णधार हरमनप्रित कौरला हिलीकरवी झेलबाद केले. कौरने 1 चौकारांसह 5 धावा जमविल्या. कौर बाद झाली त्यावेळी भारतीय संघावर थोडे दडपण आले. हरमनप्रित कौरने 4 धावा तर पूजा वस्त्रकरने 8 तसेच देवोलने 1 धाव जमविली. रिचा घोषने 117 चेंडूत 13 चौकारांसह 96 धावा जमविल्या आणि ती पाचव्या गड्याच्या रूपात बाद झाली. दिप्ती शर्माने 36 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 24 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे सुदरलँडने 3, वेरहॅमने 2 तर किंग, गार्डनर आणि गॅरेथ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया 50 षटकात 8 बाद 258 (लिचफिल्ड 63, हिली 13, इलिसी पेरी 50, मुनी 10, मॅकग्रा 24, गार्डनर 2, सुदरलँड 23, वेरहॅम 22, किंग नाबाद 28, गॅरेथ नाबाद 11, अवांत्तर 12, दिप्ती शर्मा 5-38, वस्त्रकर 1-59, श्रेयांका पाटील 1-43, स्नेह राणा 1-59), भारत 50 षटकात 8 बाद 255 (रिचा घोष 96, मानधना 34, रॉड्रिग्ज 44, दिप्ती शर्मा 24, भाटिया 14, सुदरलँड 3-47, वेरहॅम 2-39, गार्डनर, गॅरेथ, किंग प्रत्येकी 1 बळी).