विजयासह ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी
तीन सामन्यांची टी-20 मालिका : भारत सहा गड्यांनी पराभूत
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत रविवारी येथील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 चेंडूत बाकी ठेऊन 6 गड्यांनी पराभव केला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी येथे खेळविला जाणार आहे. 27 धावात 2 गडी बाद करणाऱ्या किम गर्थची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
रविवारच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 8 बाद 130 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 19 षटकात 4 बाद 133 धावा जमवित विजय नोंदविला.
भारताच्या डावामध्ये दिप्ती शर्माने 27 चेंडूत 5 चौकारांसह 30, रिचा घोषने 19 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23, स्मृती मानधनाने 26 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23 तर रॉड्रीग्जने 9 चेंडूत 3 चौकारांसह 13 धावा केल्या. ऑस्टेलियाच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. भारताच्या डावामध्ये दोन षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. रिचा घोष आणि दिप्ती शर्मा यांनी पाचव्या गड्यासाठी 33 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांकडून भारताला 14 धावा अवांतराच्या रुपात मिळाल्या. ऑस्ट्रेलियातर्फे किम गर्थ, सदरलँड आणि वेरहॅम यांनी प्रत्येकी 2 तर गार्डनरने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार हिली आणि बेथ मुनी यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला चांगली सुरुवात करुन देताना 43 चेंडूत 51 धावांची भागिदारी केली. दिप्ती शर्माने हिलीला पाटीलकरवी झेलबाद केले. तिने 21 चेंडूत 4 चौकारांसह 26 धावा केल्या. त्यानंतर दिप्ती शर्माने आपल्या पुढील षटकात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीला घोषकरवी यष्टीचीत केले. तिने 29 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. श्रेयांका पाटीलने मॅकग्राला घोषकडे झेल देण्यास भाग पाडले. तिने 21 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावा केल्या. पूजा वस्त्रकरने गार्डनरला झेलबाद केले. तिने 10 चेंडूत 1 चौकारासह 7 धावा जमविल्या. गार्डनर बाद झाली त्यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 15.4 षटकात 4 बाद 97 अशी होती. एलीस पेरी आणि लिचफिल्ड या जोडीने पाचव्या गड्यासाठी 20 चेंडूत नाबाद 36 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला 6 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी विजय मिळवून दिला. श्रेयांका पाटीलच्या गोलंदाजीवर पेरीने विजयी षटकार खेचला. ऑस्ट्रेलियाच्या डावात 2 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत भारताचे क्षेत्ररक्षण गचाळ झाले.
संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकात 8 बाद 130 (वर्मा 1, स्मृती मानधना 23, रॉड्रीग्ज 13, हरमनप्रित कौर 6, रिचा घोष 23, दिप्ती शर्मा 30, वस्त्रकार 9, अमनज्योत कौर 4, श्रेयांका पाटील नाबाद 7, अवांतर 14, गर्थ 2-27, सदरलँड 2-18, वेरहॅम 2-17, गार्डनर 1-33), ऑस्ट्रेलिया 19 षटकात 4 बाद 133 (हिली 26, मुनी 20, मॅकग्रा 19, एलीस पेरी नाबाद 34, गार्डनर 7, लिचफिल्ड नाबाद 18, अवांतर 9, दीप्ती शर्मा 2-22, पाटील 1-40, वस्त्रकार 1-8).