ऑस्ट्रेलियाची विंडीजवर 45 धावांची आघाडी
दुसरी कसोटी, किंगचे अर्धशतक, लियॉनचे 3 बळी
वृत्तसंस्था / सेंट जॉर्ज
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने यजमान विंडीजवर 45 धावांची आघाडी मिळविली आहे. विंडीजच्या पहिल्या डावात ब्रेंडॉन किंगने अर्धशतक झळकविले तर ऑस्ट्रेलियाच्या लियॉनने 75 धावांत 3 गडी बाद केले. दुसऱ्या डावात दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 12 अशी होती.
तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून विंडीजवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. विंडीजच्या वेगवान खेळपट्टीवर फलंदाजांच्या तुलनेत गोलंदाजांनी आपली हुकमत बजावली आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 66.5 षटकात 286 धावांत आटोपला. वेबस्टर आणि कॅरे यांनी अर्धशतके झळकविली तर विंडीजतर्फे अल्झारी जोसेफने 61 धावांत 4 गडी बाद केले.
विंडीजने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. पण दुसऱ्याच षटकात त्यांचा सलामीचा फलंदाज क्रेक ब्रेथवेट हॅजलवूडच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. ब्रेथवेटचा हा 100 वा कसोटी सामना होता. त्यानंतर कॅम्पबेल आणि कार्टी यांनी 40 धावांची भागिदारी केली. कर्णधार कमिन्सने कार्टीला स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपले. त्याने 6 धावा जमविल्या. कॅम्पबेलने 52 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 40 धावा जमविल्या. वेबस्टरने त्याला स्टार्ककरवी झेलबाद केले. उपाहारावेळी विंडीजने पहिल्या डावात 27 षटकात 3 बाद 110 धावा जमविल्या होत्या.
खेळाच्या दुसऱ्या सत्रात ब्रेंडॉन किंगने एका बाजुने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता तर ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज दुसऱ्या बाजुने विंडीजचे गडी बाद करत होते. कर्णधार चेसला हॅजलवूडने पायचित केले. त्याने 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. किंगने हॉपसमवेत पाचव्या गड्यासाठी 58 धावांची भर घातली. किंगने 77 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर तो अधिकवेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. तत्पूर्वी कमिन्सने शाय हॉपचा त्रिफळा उडविला. त्याने दोन चौकारांसह 21 धावा केल्या. हॉप बाद झाल्यानंतर किंग लियॉनच्या गोलंदाजीवर कॅरेकरवी झेलबाद झाला. त्याने 108 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 75 धावा झोडपल्या. ग्रिवेस लियॉनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. चहापानावेळी विंडीजने 52 षटकाअखेर 7 बाद 185 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये विंडीजने 75 धावांची भर घालताना आणखी 4 गडी गमविले.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी विंडीजचे शेवटचे तीन गडी लवकर बाद केले. अल्झारी जोसेफ आणि शमार जोसेफ या जोडीने 8 व्या गड्यासाठी 51 धावांची भार घातल्याने विंडीजला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. लियॉनने अल्झारी जोसेफला ग्रीनकरवी झेलबाद केले. त्याने 2 षटकार आणि 1 चौकारासह 27 धावा केल्या. त्यानंतर स्टार्कने शमार जोसेफनचा त्रिफळा उडविला. त्याने 2 षटकारांसह 29 धावा केल्या. हेडने स्वत:च्याच गोलंदाजीवर फिलीपला टिपले. सेल्स 7 धावांवर नाबाद राहिला. विंडीजचा पहिला डाव 73.2 षटकात 253 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे लियॉनने 75 धावांत 3 तर हॅजलवूड आणि कमिन्स यांनी प्रत्येकी 2, स्टार्क, वेबस्टर आणि हेड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने विंडीजवर पहिल्या डावात 33 धावांची आघाडी मिळविली.
33 धावांनी आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विंडीजने पुन्हा सुरुवातीलाच दोन धक्के दिले. पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर सेल्सने कोनस्टासचा त्रिफळा उडविला. त्यानंतर सेल्सने सलामीच्या उस्मान ख्वॉजाला केवळ दोन धावांवर पायचित केले. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सहा षटकात दोन बाद 12 धावा जमवित विंडीजवर एकूण 45 धावांची आघाडी मिळविली. ग्रीन 6 तर लियॉन 2 धावांवर खेळत आहेत. विंडीजतर्फे सेल्सने 5 धावांत 2 गडी बाद केले. या कसोटीतील खेळाच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी 12 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 66.5 षटकात सर्वबाद 286, विंडीज प. डाव 73.2 षटकात सर्वबाद 253 (किंग 75, कॅम्पबेल 40, शमार जोसेफ 29, अल्झारी जोसेफ 27, हॉप 21, चेस 16, अवांतर 21, लियॉन 3-75, कमिन्स आणि हॅजलवूड प्रत्येकी 2 बळी, स्टार्क, वेबस्टर, हेड प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया दु. डाव 6 षटकात 2 बाद 12 (कोनस्टास 0, ख्वॉजा 2, ग्रीन खेळत आहे 6, लियॉन खेळत आहे 2, सेल्स 2-5)