ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दुसरी अॅशेस कसोटी आजपासून
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी आज गुरुवारपासून सुरू होत असून स्टीव्ह स्मिथ गाब्बा येथे होणाऱ्या आणि दिवस-रात्र खेळविल्या जाणाऱ्या सामन्यात डोळ्यांखाली काळ्या पट्ट्या परिधान करण्यास उत्सुक आहे. फुटबॉलपटू प्रकाशात खेळताना सामान्यत: वापरतात त्या काळ्या पट्ट्या बदलत्या प्रकाशाच्या परिस्थितीत इंग्लंडच्या माऱ्याचा आणि गुलाबी चेंडूचा सामना करण्याच्या दृष्टीने स्मिथच्या प्रयत्नांचा एक भाग आहेत.
पर्थमधील मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ आठ गड्यांनी विजयी झाला आणि हा सामना दुसऱ्या दिवशी संपला. बेन स्टोक्सच्या इंग्लंड संघाने कुठल्याही परिस्थितीत आक्रमक खेळ करण्याचे बाझबॉल धोरण अवलंबताना अनेक टप्प्यांवर मजबूत गती वाया घालवल्यानंतर स्मिथला इंग्लंडकडून पुन्हा एकदा तशाच दृष्टिकोनाची अपेक्षा आहे. त्याने म्हटले आहे की, त्याचा संघ ऑस्ट्रेलियन दृष्टिकोन अधिक वापरेल म्हणजे परिस्थितीनुसार खेळण्यावर अधिक व्यावहारिक लक्ष केंद्रीत करेल. म्हणूनच त्याने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलकडून घेतलेला त्याचा नवीन लूक बराच लक्ष वेधून गेला आहे. या आठवड्यात सराव करताना त्याने त्याचा प्रयोग केला.
मी शिवनारायण चंद्रपॉलला संदेश केला आणि त्याला विचारले की, त्याचे काय विचार आहेत, तो खडूचा वापर करत होता की, पट्ट्यांचा. त्याने पट्ट्या असे सांगितले आणि त्याला वाटते की, ते 65 टक्के चकाकी रोखते, असे स्मिथने बुधवारी दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला कर्णधाराच्या पत्रकार परिषदेत सांगितले. ‘चंद्रपॉलने असेही म्हटले की, मी छायाचित्रे पाहिली आहेत आणि तू ते चुकीच्या पद्धतीने परिधान करत आहेस. तर काल मी त्या पट्ट्या योग्य पद्धतीने परिधान केल्या आणि मी त्याच्याशी सहमत आहे. हे नक्कीच चमक थांबवते आणि मी ते परिधान करणार आहे’, असे स्मिथने पुढे सांगितले.
मागील आठवड्यात पर्थमध्ये झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे उस्मान ख्वाजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला किमान एक बदल करावा लागला आहे. बहुतेक तज्ञांनी जोश इंग्लिश मधल्या फळीत परतण्याची आणि पहिल्या कसोटीतील स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेड पुन्हा डावाची सुऊवात करण्याची शक्यता वर्तवली आहे. स्मिथ म्हणाला की, ऑस्ट्रेलिया खेळपट्टीचे योग्य निरीक्षण होईपर्यंत संघाची अंतिम घोषणा करणार नाही. त्यानंतर दुखापतग्रस्त कर्णधार पॅट कमिन्सला संघात नसताना घाईघाईने संघात आणल्याबद्दलच्या अटकळांना त्याला सामोरे जावे लागले. त्याने अनेक प्रश्नांचा सामना केला, पण निश्चित उत्तर दिले नाही.
ऑस्ट्रेलियन संघाची दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी राहिलेली आहे, ज्यामध्ये एकमेव डाग म्हणजे गेल्या वर्षी जानेवारीमध्ये गाब्बा येथे वेस्ट इंडिजविऊद्ध त्यांचा आठ धावांनी पराभव झाला होता. हा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियन संघ या ठिकाणी अनेक दशकांपासून जवळजवळ अजिंक्य राहिलेला आहे. 1986 पासून इंग्लंडने गाब्बा येथे अॅशेस कसोटी जिंकलेली नाही आणि 2010-11 च्या मालिकेपासून ऑस्ट्रेलियन भूमीवर एकही कसोटी जिंकलेली नाही. इंग्लंडचा आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवण्याची प्रतिज्ञा स्टोक्सने केली आहे. या धोरणावर पर्थमध्ये जोरदार टीका झाली होती.
सामन्याची भारतीय वेळ : सकाळी 9.30 पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार