पहिल्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
ऑस्ट्रेलियाचा 487 धावांचा डोंगर, मिचेल 90, जमालचे 6 बळी, पाक 2 बाद 132
वृत्तसंस्था/ पर्थ
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीवर यजमान ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर राखले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 487 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर पाकने दिवसअखेर पहिल्या डावात 2 बाद 132 धावा जमविल्या. पाकच्या आमेर जमालने 111 धावात 6 गडी बाद केले.
या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 5 बाद 346 या धावसंख्येवरुन शुक्रवारी खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटचे पाच गडी 141 धावांची भर घालत तंबूत परतले. सलामीच्या डेव्हिड वॉर्नरने 211 चेंडूत 4 षटकार आणि 16 चौकारांसह 164 धावांची खेळी केली. ख्वॉजाने 6 चौकारांसह 41 तर स्टिव्ह स्मिथने 4 चौकारांसह 31, हेडने 6 चौकारांसह 40 धावा जमविल्या. मार्श आणि कॅरे या नाबाद राहिलेल्या जोडीने शुक्रवारी पुढे खेळाला सुरूवात केली आणि पाकच्या अमीर जमालने कॅरेचा त्रिफळा उडविला. कॅरेने 73 चेंडूत 4 चौकरांसह 34 धावा जमविताना मार्श समवेत सहाव्या गड्यासाठी 90 धावांची भागिदारी केली. स्टार्कने 2 चौकारांसह 12, कर्णधार कमिन्सने 1 चौकारासह 9 तर लियॉनने 5 धावा केल्या. मिचेल मार्शने 107 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह 90 धावा झळकविल्या. त्याचे शतक 10 धावांनी हुकले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 113.2 षटकात 487 धावांवर आटोपला. पाकतर्फे आमेर जमाल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 111 धावात 6 गडी बाद केले असून शेहजादने 2 तर शाहीन आफ्रिदी व अश्रफ यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
अब्दुल्ला शफीक आणि इमाम उल हक यांनी पाकच्या पहिल्या डावाला सावध सुरूवात केली. या जोडीने 36.2 षटकात 74 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज लियॉनने शफीकला वॉर्नरकरवी झेलबाद केले. त्याने 121 चेंडूत 6 चौकारांसह 42 धावा जमविल्या. कर्णधार शान मसूदने इमाम उल हक समवेत दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भर घातली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपण्यापूर्वी पाकने आणखी एक फलंदाज गमविला. स्टार्कने कर्णधार शान मसूदला कॅरेकरवी झेलबाद केले. त्याने 43 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा केल्या. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला त्यावेळी पाकने 53 षटकात 2 बाद 132 धावा जमविल्या होत्या. इमाम उल हक 3 चौकारांसह 38 तर शेहजाद 1 चौकारासह 7 धावावर खेळत होते. पाकचा संघ अद्याप 355 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज लियॉन याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 497 गडी बाद केले असून तो आता 500 बळींच्या समिप पोहोचला आहे. त्याला हा टप्पा गाठण्यासाठी आता केवळ 3 बळी मिळविने गरजेचे आहे. 1995 पासून पाक संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामना जिंकलेला नाही. या पहिल्या कसोटीत लियॉनने शफीकला बाद करुन आपला 497 वा बळी नोंदविला आहे.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 113.2 षटकात सर्व बाद 487 (डेव्हिड वॉर्नर 164, ख्वाजा 41, स्मिथ 31, हेड 40, मिचेल मार्श 90, कॅरे 34, स्टार्क 12, आमेर जमाल 6-111, शेहजाद 2-83, शाहीन आफ्रिदी 1-90, अशरफ 1-93), पाक प. डाव 53 षटकात 2 बाद 132 (अब्दुल्ला शफीक 42, इमाम उल हक खेळत आहे 38, शान मसूद 30, शेहजाद खेळत आहे 7, अवांतर 15, लियॉन 1-40, स्टार्क 1-24).