वेस्ट इंडिजमध्ये कांगारू ढेर
वेस्ट इंडिज वि. ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी : ऑस्ट्रेलियाचा 180 धावांत खुर्दा : यजमान विंडीजचीही खराब सुरुवात, दिवसअखेरीस 4 बाद 57
वृत्तसंस्था/ब्रिजटाऊन (वेस्ट इंडिज)
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच मालिकेतील पहिल्याच सामन्यात बलाढ्या कांगारुंना यजमान वेस्ट इंडिजने जोरदार दणका दिला. बार्बाडोसमध्ये सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शमार जोसेफ आणि जेडेन सील्स यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन संघ 180 धावांत ऑलआऊट झाला. पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघानेही विंडीजला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि दिवसअखेरीस विंडीजच्या चार फलंदाजांना माघारी पाठवले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विंडीजने 20 षटकांत 4 गडी गमावत 57 धावा केल्या होत्या. ब्रेन्डॉन किंग 23 तर रोस्टन चेस 1 धावांवर खेळत होते.
विंडीजचीही दाणादाण
ऑस्ट्रेलियन संघ 180 धावांत ऑलआऊट झाल्यानंतर यजमान वेस्ट इंडिज संघ फलंदाजीसाठी आला. वेस्ट इंडिजचीही सुरुवात चांगली झाली नाही. यजमान संघाने पहिल्या दोन विकेट फक्त 16 धावांवर गमावल्या. त्यानंतर केसी कार्टी आणि ब्रेन्डॉन किंग यांनी एकेरी-दुहेरी धावांवर भर देत संघाची धावसंख्या 50 च्या पुढे नेली. ही जोडी जमलेली असतानाच कार्टीला कमिन्सने माघारी पाठवले. त्याने 20 धावा केल्या. तर जोमेल वेरिकनला हेजलवूडने भोपळाही फोडू दिला नाही. पहिल्या दिवसाच्या अखेरीस, यजमान वेस्ट इंडिजनेही 4 विकेट गमावून एकूण 57 धावा केल्या होत्या. आता वेस्ट इंडिज संघ 123 धावांनी मागे आहे. ब्रेन्डॉन किंग आणि कॅप्टन रोस्टन चेस ही जोडी दिवसाचा खेळ संपल्यांनतर नाबाद परतली. ब्रेन्डॉन 23 तर रोस्टन 1 धाव करुन नाबाद आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या दिवसात एकूण 14 विकेट्स पडल्या असून या पिचवर गोलंदाजांना भरपूर साथ मिळते आहे. यामुळे दुसऱ्या दिवशी यजमान विंडीज संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव सर्वबाद 180 (उस्मान ख्वाजा 47, ट्रॅव्हिस हेड 59, पॅट कमिन्स 28, वेबस्टर 11, सील्स 5 तर जोसेफ 4, जस्टीन ग्रेव्हज 1 बळी) वेस्ट इंडिज पहिला डाव 20 षटकांत 4 बाद 57 (क्रेग ब्रेथवेट 4, कॅम्पबेल 7, केसी कार्टी 20, वेरिकन 0, किंग खेळत आहे 20, चेस खेळत आहे 1, मिचेल स्टार्क 2 बळी, कमिन्स व हेजलवूड प्रत्येकी 1 बळी).