For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाचा द. आफ्रिकेवर 7 गड्यांनी विजय

06:42 AM Oct 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाचा द  आफ्रिकेवर 7 गड्यांनी विजय
Advertisement

सामनावीर अॅलिना किंगचे 18 धावांत 7 बळी

Advertisement

वृत्तसंस्था / इंदोर

अॅलिना किंगच्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील प्राथमिक फेरीच्या शेवटच्या सामन्यात बलाढ्या द. आफ्रिकेचा 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात किंगने 18 धावांत 7 गडी बाद केले.

Advertisement

इंदोरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. अॅलिना किंगच्या फिरकी माऱ्यासमोर द. आफ्रिका महिला संघाचा डाव केवळ 24 षटकात 97 धावांत आटोपला. द. आफ्रिकेच्या केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. कर्णधार वूलव्हर्टने 26 चेंडूत 7 चौकारांसह 31 धावा जमविल्या. सिनालो जेप्टाने 17 चेंडूत 7 चौकारांसह 29 धावा जमविल्या. तर डी. क्लर्कने 23 चेंडूत 2 चौकारासह 14 धावा केल्या. द. आफ्रिका संघातील तीन फलंदाजांना खाते उघडता आले नाही. द.आफ्रिकेचा निम्मा संघ 15.2 षटकात 60 धावांत बाद झाला होता. वूलव्हर्ट आणि ब्रिट्स यांनी सलामीच्या गड्यासाठी 32 धावांची भागिदारी केली. त्यानंतर द. आफ्रिकेचे शेवटचे 9 गडी 65 धावांत बाद झाले. ऑस्ट्रेलियातर्फे अॅलिना किंगने आपल्या सात षटकात 18 धावांच्या मोबदल्यात 7 गडी बाद केले. मेगान स्कूट, गॅरेथ आणि गार्डनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 16.5 षटकात विजयाचे उद्दिष्ट गाठताना 98 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरूवात झाल्यानंतर तिसऱ्या षटकात द. आफ्रिकेच्या कॅपने ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाजी लिच फिल्डला केवळ 5 धावांवर ट्रायोनकरवी झेलबाद केले. त्यानंतर द. आफ्रिकेच्या क्लासने इलेसी पेरीला खाते उघडण्यापूर्वीच डी. क्लर्ककरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाची स्थिती यावेळी दोन बाद 11 अशी होती. जॉर्जीया व्हॉल आणि बेथ मुनी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 76 धावांची भागिदारी केली. डी. क्लर्कने बेथ मुनीला झेलबाद केले. मुनीने 41 चेंडूत 6 चौकारांसह 42 धावा जमविल्या. मुनी बाद झाली त्यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची जरुरी होती. व्हॉल आणि सदरलँड्स यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. व्हॉलने 38 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 38 तर सदरलँड्सने 4 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 10 धावा जमविल्या. द. आफ्रिकेतर्फे डी. क्लर्क, कॅप आणि क्लास यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. ऑस्ट्रेलियाच्या अॅलिना किंगची ही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन महिला संघाने गुण तक्त्यात 7 सामन्यांतून 13 गुणांसह पहिले स्थान मिळविले असून द. आफ्रिकेने 7 सामन्यांतून 10 गुणांसह दुसरे तर इंग्लंडने 6 सामन्यातूंन 9 गुणांसह तिसरे स्थान घेतले आहे. भारत 6 सामन्यांतून 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. यजमान भारताचा प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना बांगलादेशबरोबर रविवारी खेळविला जाणार आहे. प्राथमिक फेरीतील सामन्यांच्या निकालाचा उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांवर कोणताही परिणाम होणार नाही.

संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका 24 षटकात सर्वबाद 97 (वूलव्हर्ट 31, जेप्टा 29, डी. क्लर्क 14, अॅलिना किंग 7-18, स्कूट, गॅरेथ व गार्डनर प्रत्येकी 1 बळी),ऑस्ट्रेलिया 16.5 षटकात 3 बाद 98 (व्हॉल नाबाद 38, लिचफिल्ड 5, पेरी 0, मुनी 42, सदरलँड्स नाबाद 10, कॅप, डी. क्लर्क, क्लास प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.