ऑस्ट्रेलियाचा पाकवर 13 धावांनी विजय
स्पेन्सर जॉन्सन ‘सामनावीर’, मालिकेत कांगारुंची विजयी आघाडी
► वृत्तसंस्था / सिडनी
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 13 धावांनी विजय मिळविला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा विजय नोंदवित पाकवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्पेन्सर जॉन्सनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 26 धावांत 5 गडी बाद केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 147 धावा जमविल्या. त्यानंतर पाकचा डाव 19.4 षटकात 134 धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीच्या शॉर्टने 17 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 32, मॅकगर्कने 9 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 22 चेंडूत 52 धावांची भागिदारी केली. कर्णधार इंग्लीसला खाते उघडता आले नाही. मॅक्सवेलने 20 चेंडूत 2 चौकारांसह 21, स्टोईनीसने 1 चौकारासह 14, टीम डेव्हीडने 19 चेंडूत 2 चौकारांसह 18 आणि हार्डीने 23 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 28 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 4 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे हॅरीस रौफने 22 धावांत 4 तर अब्बस आफ्रिदीने 17 धावांत 3 आणि मुकीमने 21 धावांत 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 61 धावा जमविताना 3 गडी गमविले. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 19 चेंडूत तर शतक 79 चेंडूत फलकावर लागले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना जॉन्सनच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकला 19.4 षटकात 134 धावांपर्यंत मजल मारता आली. इरफान खानने एकाकी लढत देत 28 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 37 तर उस्मान खानने 38 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 52, कर्णधार रिझवानने 26 चेंडूत 1 चौकारांसह 16 धावा जमविल्या. पाकच्या तीन फलंदाजांना खाते उघडता आले नाही. पाकने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 30 धावा जमविताना 2 गडी गमविले. पाकचे अर्धशतक 62 चेंडूत तर शतक 89 चेंडूत फलकावर लागले. उस्मान खान आणि इरफान खान यांनी पाचव्या गड्यासाठी 58 धावांची भागिदारी केली. उस्मान खानने 35 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना येत्या सोमवारी होबार्ड येथे खेळविला जाणार आहे. पाकिस्तानने अलिकडे तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकात 9 बाद 147 (शॉर्ट 32, मॅकगर्क 20, मॅक्सवेल 21, स्टोईनीस 14, डेव्हीड 18, हार्डी 28, अवांतर 8, हॅरीस रौफ 4-22, अब्बास आफ्रिदी 3-17, मुक्कीम 2-21), पाक: 19.4 षटकात सर्वबाद 134 (उस्मान खान 52, इरफान खान 37, रिझवान 16, अवांतर 15, जॉन्सन 5-26, झंपा 2-19, बार्टलेट 1-18)