ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर 8 गडी राखून विजय
वृत्तसंस्था/ पुणे
अष्टपैलू मिचेल मार्शने केलेल्या नाबाद 177 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने शनिवारी येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीतील लढतीच्या आधी हुरुप वाढविणाऱ्या आणखी एका विजयाची नोंद केली. बांगालदेशने ऑस्ट्रेलियासमोर 307 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण डेव्हिड वॉर्नर (53) आणि स्टीव्ह स्मिथ (नाबाद 63) यांची अर्धशतके आणि मार्शचे तिसरे एकदिवसीय शतक यामुळे 32 चेंडू बाकी असताना ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य पार केले.
पाच वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया आता उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे भिडणार आहे. दुसरीकडे, बांगलादेशची मोहीम आणखी एका पराभवासह संपली आहे आणि भारताने रविवारी नेदरलँड्सला हरवले, तर ते त्यांचे आठवे स्थान टिकवून ठेवू शकतील तसेच पाकिस्तानमध्ये 2025 साली होणार असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील.
मार्शने आपल्या उत्कृष्ट खेळीत तब्बल 9 षटकार आणि 17 चौकार हाणले. वॉर्नरसह त्याने दुसऱ्या यष्टीसाठी 116 चेंडूंत 120, तर स्मिथसह तिसऱ्या यष्टीसाठी 136 चेंडूंत 175 धावा जोडल्या. ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद 201 धावांनंतर मार्शची खेळी ही या विश्वचषकातील दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तत्पूर्वी, बांगलादेशने स्पर्धेतील आपल्या सर्वोत्तम फलंदाजीचे प्रदर्शन घडविताना 8 बाद 306 धावा केल्या. त्यात लिटन दास (36) आणि तन्झिद हसन (36) यांनी चांगली सुऊवात करून दिल्यानंतर तौहीद हृदॉयने 79 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह काढलेल्या 74 धावांचा मोलाचा वाटा राहिला.
ऑस्ट्रेलियातर्फे अॅडम झॅम्पाने 2 बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले. शॉन अॅबॉटनेही विश्वचषकातील पहिला सामना खेळताना दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडला (10) लवकर गमावले होते. परंतु मार्श आणि वॉर्नरने त्यांचा डाव सावरला. 37 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केलेल्या मार्शने 31 व्या षटकात आपले शतक पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 50 षटकांत 8 बाद 306 (तन्झिद हसन 36, लिटन दास 36, नजमुल हुसेन शांतो 45, तौहीद ह्रदॉय 74, महमुदुल्लाह 32, मेहिदी हसन 29. अॅबॉट 2-61, झॅम्पा 2-32, स्टॉइनिस 1-45) ऑस्ट्रेलिया 44.4 षटकांत 2 बाद 307 (वॉर्नर 53, मिचेल मार्श नाबाद 177, स्मिथ नाबाद 63, तस्किन अहमद 1-61, मुस्तफिजुर रेहमान 1-76).