For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने जाहीर केला संघ

06:44 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाने जाहीर केला संघ
Advertisement

पर्थ कसोटीत दोन नवखे चेहरे दिसणार

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

प्रतिष्ठेच्या आणि बहुचर्चित बॉर्डर-गावसकर मालिकेतील पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर उस्मान ख्वाजाच्या बरोबरीने सलामीवीर कोण असणार यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने नॅथन मॅकस्विनीला संधी देण्याचं ठरवले आहे. ऑस्ट्रेलियाने 13 सदस्यीय संघाचीच घोषणा केली आहे. अनुभवी पॅट कमिन्सकडे नेतृत्वाची धुरा कायम असणार आहे.

Advertisement

अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन दुखापतग्रस्त असल्याने निवड समितीने सहा फलंदाज, एक यष्टीरक्षक आणि चार गोलंदाज अशा पद्धतीने संघाची रचना केली आहे. वॉर्नरच्या निवृत्तीनंतर सलामीवीर म्हणून खेळलेला अनुभवी स्टीव्हन स्मिथ त्याच्या मूळ जागी अर्थात चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी यांच्यासह मार्नस लाबुशेन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श फलंदाजीची धुरा सांभाळतील. अॅलेक्स कॅरे सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे, त्यामुळे त्याची निवड होणे स्वाभाविक आहे असे निवड समितीने म्हटले आहे. कर्णधार पॅट कमिन्स याच्यासह मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड हे वेगवान गोलंदाजीचे आक्रमण सांभाळतील. गेली अनेक वर्ष हेच त्रिकुट ऑस्ट्रेलियाचा कणा झालं आहे. नॅथन लियान संघातला एकमेव फिरकीपटू असेल.

मॅकस्विनी, बोलँडला स्थान

मार्कस हॅरिस, सॅम कोन्टास हे दोघांच्या नावाची चर्चा होती पण जॉर्ज बेली यांच्या नेतृत्वातील निवड समितीने मॅकस्विनीच्या नावाला पसंती दिली आहे. भारत अ संघाविरूद्धच्या लढतीत मॅकस्विनीला 14 आणि 25 अशा धावा करता आल्या. मात्र डोमेस्टिक क्रिकेटमधल्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्याच्या नावाला प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय, निवड समितीने वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडला देखील संघात स्थान दिले आहे. त्याचा राखीव गोलंदाज म्हणून संघात समावेश असेल. याशिवाय, जोस इंग्लिशचीही संघात सरप्राईज एंट्री झाली आहे.

पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियान, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

Advertisement
Tags :

.