ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने टाळला व्हाईटवॉश
अॅलिसा हिलीचे नाबाद शतक : ताहिला मॅकग्राचे तीन बळी
वृत्तसंस्था / ब्रिसबेन
येथे रविवारी झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने आपला संभाव्य व्हाईटवॉश टाळताना शेवटच्या सामन्यात भारत अ महिला संघाचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला. भारत अ महिला संघाने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. शेवटच्या सामन्यात यष्टीरक्षक आणि सलामीची फलंदाज अॅलिसा हिलीने दमदार नाबाद शतक (137) तर ताहिला मॅकग्राने 40 धावांत 3 गडी बाद केले.
या मालिकेतील पहिले सलग दोन सामने भारत अ महिला संघाने जिंकून मालिका जेतेपद निश्चित केले होते. रविवारच्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने नाणेफेक जिंकून भारत अ संघाला प्रथम फलंदाजी दिली. भारत अ महिला संघाचा डाव 47.4 षटकात 216 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलिय अ महिला संघाने 27.5 षटकात 1 बाद 222 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला.
भारत अ महिला संघाच्या डावामध्ये शेफाली वर्माने 7 चौकारांसह 52 तर नंदीनी काश्यपने 28 धावा जमविताना सलामीच्या गड्यासाठी 86 धावांची भागिदारी केली. पण मॅकग्राकडे चेंडू सोपविल्यानंतर भारत अ संघाच्या डावाला गळती सुरु झाली. मॅकग्राने शेफाली वर्मा आणि काश्यप तसेच तेजल हसबनीसला पाठोपाठ बाद केल्याने भारताची स्थिती 3 बाद 89 अशी केविलवाणी झाली. हसबनीसने 1 धाव जमविली. यास्तिका भाटियाने संघाचा डाव सावरण्याचा थोडाफार प्रयत्न करताना 54 चेंडूत 42 धावा जमविल्या. राघवी बिस्तने 18, तनुश्री सरकारने 17 धावा केल्या. यास्तिका हिलीकरवी बाद झाल्यानंतर भारत अ महिला संघाचे शेवटचे फलंदाज लवकर बाद झाल्याने डाव 47.4 षटकात 216 धावांत आटोपला. ताहिला मॅकग्राने 40 धावांत 8 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलिया अ महिला संघाची सलामीची फलंदाज अॅलिसा हिलीने चौफेर फटकेबाजी करताना 84 चेंडूत 3 षटकार आणि 23 चौकारांसह नाबाद 137 धावा झळकाविल्या. मात्र भारत अ महिला संघाच्या गलथान क्षेत्ररक्षणामुळे हिलीला 7 आणि 49 धावांवर असताना दोन जीवदाने मिळाली. या जीवदानाचा लाभ घेत तिने आपले नाबाद शतक झळकाविले. हिलीने ताहिला विल्सन समवेत सलामीच्या गड्यासाठी 137 धावांची भागिदारी केली. विल्सनने 59 धावा जमविल्या. भारताच्या राधा यादवने ताहिला विल्सनला बाद केले. ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने 27.5 षटकात 1 बाद 222 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी एकतर्फी जिंकला.
संक्षिप्त धावफलक : भारत अ महिला संघ 47.4 षटकात सर्वबाद 216 (शेफाली वर्मा 52, यास्तिका भाटिया 42, राघवी बिस्त 18, तनुश्री सरकार 17, ताहिला मॅकग्रा 3-40), ऑस्ट्रेलिया अ महिला संघ 27.5 षटकात 1 बाद 222 (अॅलिसा हिली नाबाद 137, ताहिला विल्सन 59, राधा यादव 1-46).