कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घोर अपेक्षाभंग !

06:59 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत, ऑस्ट्रेलिया 6 गडी राखून विजयी,  ऑस्ट्रेलियाला विक्रमी सहाव्यांदा विजेतेपद

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जमलेले एक लाख तीस हजार भारतीय क्रिकेट रसिक आणि त्या पलीकडे टीव्ही आणि मोबाईलवर डोळे लावून बसलेले एक अब्जाहून अधिक क्रिकेट रसिक यांनी भारताने यजमानपद भूषविताना विश्वचषक जिंकलेला पाहण्याचे जे स्वप्न बाळगले होते त्यावर ऑस्ट्रेलियाने रविवारी 6 गडी राखून आरामात विजय मिळवत पाणी ओतले. ऑस्ट्रेलियाचे हे विक्रमी सहावे एकदिवसीय जगज्जेतेपद आहे. ऑस्ट्रेलिया महत्त्वाच्या क्षणी आपल्या खेळामध्ये सुधारणा करून उसळी घेण्यासाठी का विख्यात आहे त्याची झलक या सामन्यातून त्या संघाने दाखवून दिली.

भारताने साखळी फेरीत आणि उपांत्य फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवताना दहा सामने सलग जिंकले होते आणि अशी कामगिरी या स्पर्धेतील अन्य कुठल्याही संघाला करता आली नव्हती. खुद्द स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून दाखविले होते. त्यामुळे एकंदर सर्वकष कामगिरी पाहता हा सामना सुरू होण्यापूर्वी जरी ऑस्ट्रेलिया संघ घातक असला, तरी भारताचे पारडे जड मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात मैदानावर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिल्यानंतर भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियासमोर तीनशेच्या घरातील आव्हानात्मक धावसंख्या उभी करता आली नाही आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांना सुऊवातीला यश मिळूनही ऑस्ट्रेलियाला लवकर गुंडाळणे शक्य झाले नाही. त्यामुळे भारताला अंतिम फेरीत स्पर्धेतील पहिला पराभव पत्करावा लागला.

भारताने रविवारी विश्वचषक जिंकल्यास हा त्यांचा 11 वा सलग विजय ठरला असता. अशी कामगिरी करणारा तो स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ ठरला असता. मात्र ही संधी ऑस्ट्रेलियाने हिरावून घेतली आणि सर्व भारतीय रसिकांचा घोर अपेक्षाभंग झाला. भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी ही संपूर्ण स्पर्धेत वरचढ ठरली होती. त्यामुळे रोहित शर्माने नेहमीप्रमाणे वेगवान सुरुवात करून दिल्यानंतर भारत मोठी मजल मारणार असे वाटत होते. पण या आघाडीवर निराशा झाली. कारण अर्धशतक नोंदवून दुर्दैवी पद्धतीने त्रिफळाचीत झालेला विराट कोहली आणि के. एल. राहुल वगळता शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव हे साफ अपयशी ठरले. त्याशिवाय शेपटूही फारशी चमक दाखवू शकले नाही. मिचेल स्टार्क, कमिन्स आणि हेझलवूडसह सर्व ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीला अडविण्याची जबाबदारी व्यवस्थित पेलली.

त्यामुळे भारताचा डाव 50 षटकांत अवघ्या 240 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतरही मोहम्मद शामीने फॉर्मात असलेला वॉर्नर आणि बुमराहने घातक मिचेल मार्शसह, स्टीव्ह स्मिथला स्वस्तात परतीची वाट दाखवून 3 बाद 47 अशी बिकट स्थिती केल्याने भारतीय विजयाची आशा दिसली होती. स्पर्धेत भारतीय गोलंदाजांनी सातत्याने चांगली कामगिरी केल्याने लोकांच्या आशा उंचावल्या होत्या. पण त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि लाबुशेन ही जोडी जमली आणि ती वेळीच फोडण्यात शामी, सिराज, बुमरासह प्रामुख्याने रवींद्र जडेजा व कुलदीप यादव या मधल्या षटकांतील फिरकी जोडीला अपयश आले. जर शंभरच्या आंत ही जोडी फुटली असती आणि दिडशेच्या आंत आणखी एक-दोघे बाद झाले असते, तर भारताला जोरदार आशा बाळगण्यास वाव मिळाला असता.

पण तसे घडले नाही. हेडने शानदार शतक नोंदविताना 120 चेंडूंत 137 धावा काढल्या आणि भारतीयांच्या आशा-आकांक्षांवर खऱ्या अर्थाने पाणी टाकले. त्याला 110 चेंडूंत नाबाद 58 धावांची खेळी करणाऱ्या लाबुशेनची तेवढीच भक्कम साथ लाभली.  शेवटी ही जोडी फोडण्यात मोहम्मद सिराजला यश आले. पण तोवर विजयाचे सोपस्कार ही केवळ औपचारिकता राहिली होती आणि ऑस्ट्रेलियाला फक्त दोन धावांची गरज होती. हेडला मॅच विनिंग खेळी करूनही विजयी धाव मात्र फटकावता आली नाही. ते काम पुढे मॅक्सवेलने केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#cricket#social media#sports
Next Article