शिवतत्त्वाचे शुभसंकेत
सृष्टीचे वैभव अनुभवताना माणसाचे मन आनंदाने भरून येते ते श्रावण महिन्यात. सण, उत्सव यांची धांदल-गडबड आयुष्याला वेग आणते. मनावरची मरगळ दूर करते. एरवी जगण्याच्या कोलाहलात आठवड्याचे वार माणूस विसरून जातो. परंतु श्रावण महिन्यातला प्रत्येक वार विशिष्ट देवतेच्या पूजेमुळे त्याच्या लक्षात राहतो. त्यातल्या त्यात श्रावण सोमवारचे व्रत सर्वांच्या आवडीचे, श्रद्धा-भक्तीचे आहे. रिमझिम पाऊस, उपास, शिवमूठ, पांढरी फुले, दूध आणि बेलाची एकशे आठ पाने यामुळे सोमवार सजतो, सार्थकी लागतो. शिवाच्या देवळात जाऊन शिवपिंडीवर जलाभिषेक केला की नकारात्मक शक्ती कुठल्या कुठे पळून जाते. ‘कैलासराणा शिव चंद्रमौली, फणींद्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्यसिंधू भवदु:खहारी, तुजविण शंभो मज कोण तारी?’ ही भक्तांची हाक ऐकून भोलेनाथ धावून येतात. शिव उपासना भौतिक, सांसारिक, व्यावहारिक, ऐहिक सुख देणारी नाही. ती वैराग्य, विरक्ती देणारी आहे. शंभर वर्षे आयुष्य जगून चुकलेला माणूसही विरक्तीकडे क्वचितच वळतो कारण भोगाने जीवन व्यापलेले असते. तरीही माणसाला जास्त ओढ शिवशंकराची असते. कारण अंतरातल्या आत्म्याची ती स्वाभाविक धाव असते. उतार शोधून गाणे गाणाऱ्या पाण्यासारखी ती आत्म्याची आदिम ओढ उगमाकडे म्हणजे शिवतत्त्वाकडे जाते.
शिव म्हणजे सृजन आणि शिव म्हणजेच संहार. जीवसृष्टी ही शिवतत्त्वातून उदयाला येते आणि शिवतत्त्वातच विलीन होते. माणसाच्या आत्म्याचे नाते हे शिवाशी आहे. सृजन आणि संहार हे फक्त देहाशी निगडित आहे. परंतु आत्मा अविनाशी आहे. एखाद्या देहातून प्राणपाखरू उडून गेले असे आपण म्हणतो तेव्हा देह नष्ट होतो, प्राण नाही. ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे’ असे आपण म्हणतो तर हे निजरूप म्हणजे शिव आहे.
समर्थ रामदास स्वामींनी ‘लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा’ असे शंकराचे रूप वर्णिले आहे. आपण अनुभवले की महामारीच्या काळामध्ये स्मशानाकडे नुसती नजर गेली तरी जिवात धडकी भरत होती. एकाच वेळी अनेक प्रेते जळत होती. त्या ज्वाळा भय निर्माण करीत होत्या. सृष्टीचे परिभ्रमण चक्र हे साक्षात शिवाच्या हातात आहे. त्याचे रौद्र रूप म्हणजे मृत्यू आहे. समर्थ रामदासस्वामी पुढे म्हणतात, ‘लावण्यसुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा’.. जिवाला भयंकर वाटणारे हेच रूप पुन्हा नवी जीवसृष्टी निर्माण करणारे आहे. पाण्यामधून पुन्हा नवे, कोवळे जीव निर्माण होतात. शिवाच्या मस्तकी शुभ्र गंगाजळ आहे. सृष्टीचे हे नित्यनूतन तत्त्व आहे. पांढरा रंग हा शिवाचा आवडता आहे. कैलास पर्वतावर शुभ्र बर्फाच्छादित प्रदेशात त्यांचा निवास आहे. पांढरा रंग परिधान केला की माणूस जागरूक असतो. कुठेही डाग पडू नये म्हणून आपण सावध असतो. पांढऱ्या रंगाचा पोशाख घातला की मन प्रसन्न होते. षड्रिपूंचे डाग मनावर पडू नयेत म्हणून शिवस्मरणात माणूस स्वस्थ राहतो. पांढरा रंग हा सोहम जपाची आठवण करून देतो. प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारा परमेश्वर म्हणजे समुद्र. तो पांढऱ्या शुभ्र लाटांद्वारे सोहम जप करीत असतो. सोमवारी, प्रदोष व्रत तसेच एकादशीला पांढरे वस्त्र घालावे. मनावर त्याचा शुभ परिणाम होतो.
निळ्याशार आकाशामध्ये बगळ्यांची पांढरी शुभ्र माळ बघितली की आपलं मन हरखून जातं. नीलगर्भ सरोवरात डौलदारपणे विहार करणारे शुभ्र हंस गूढ आनंदाचा अनुभव देतात. पांढरी गाय, कुत्रा, कबूतर, मोर, पोपट माणसांचं लक्ष वेधून घेतात. शब्दमोहिनी, विश्वमोहिनी श्री शारदा शुभ्रवस्त्रधारिणी आहे. सरस्वतीचा रंग जसा पांढरा आहे, तसे सृजन करणारे सर्जक श्री शंकर हे धवळे म्हणजे रंगाने गोरेपान आहेत. विश्वाचे चालक असणारे सांब सदाशिव यांच्या जटेमधलं गंगाजळ पांढरं शुभ्र आहे. गळ्यामधली स्फटिकांची माळ, गळ्यातले साप, हातामधला त्रिशूळ हे सुद्धा पांढरे आहेत. शंकरांनी धारण केलेली विभूती, भस्म हेही पांढरे. शंकराचे वस्त्रही पांढरे आहे. हिमालय हा बर्फाने आच्छादलेला असल्याने पांढराच आहे. म्हणजे त्याचा निवास कैलासभुवनही पांढरं आहे. म्हणून त्याला ‘कर्पूरगौर’ असं म्हणतात.
शंकराचा वार सोमवार. त्याची पूजा करताना प्रदोषकाळी आपण पांढरी फुलं, दहीभात आणि स्वत:चे वस्त्रही पांढरे ठेवून पूजा बांधावी. यामुळे शंकर संतुष्ट होतो. शिवाचं हास्य देखील शुभ्र आहे. पांढरा रंग हा शुभशकुनी समजला जातो. प्राचीन काळी एखादं नवं गाव वसवताना पांढरे बैल नांगराला जुंपून ती भूमी नांगरत. मंगल प्रसंगी घरीदारी आपण जी पूजा करतो त्या पूजेत पांढऱ्या रंगाचं प्राबल्य जास्त असतं. पांढरा दोरा वापरून कलश, नारळ बांधतात. देवाला कापसाचं वस्त्र असतं. दुधाचा नैवेद्य असतो. चांदीची पात्रं, चांदीची नाणी मंगलसूचक असतात. संपूर्ण पांढऱ्या रंगाला एखाद्या वेगळ्या रंगाची किनार असेल तर आपलं मन निश्चिंत होतं. कारण अत्यंत अशुभ प्रसंगीदेखील पांढऱ्या रंगाचा वापर होतो. खरं म्हणजे आयुष्यातले दु:खद प्रसंग आपल्याला सत्य, शांती आणि विरक्तीचं शिक्षण देत असतात. तेव्हा मनावरचं अनामिक दडपण दूर व्हावं म्हणून पांढरा रंग वापरतात. अनेक उत्सवांमध्ये, विशेष महोत्सवांमध्ये महानैवेद्यासाठी पांढऱ्या तांदळाची खीर, भात हे पदार्थ करतात. सुवासिनींची ओटी तांदळाने भरतात. पांढरा रंग हा आपल्या आहारात आणि उपासनेतही अग्रस्थानी आहे. तो आरोग्यदायी तर आहेच शिवाय उपासना करताना मन शुद्ध स्वच्छ असावं हा बहुमोल संदेश देखील आहे.
शिवतत्त्व म्हणजे जागृत अवस्थेत जगा आणि जागृत अवस्थेत मरा. जागृत अवस्थेतील मरण म्हणजे देहबुद्धी सोडणे होय. शिव अमर आहे. देह जाणतेपणे गेला तर ते सुंदर मरण आहे. मी म्हणजे शरीर नाही. त्याच्याशी निगडित सुखदु:ख नाही. सत् चित् आनंदाची ओळख म्हणजे शिवतत्त्व ही ओळख दृढ व्हावी म्हणून ‘ओम नम: शिवाय’ हा मंत्र सदैव मुखी हवा एवढे खरे!
- स्नेहा शिनखेडे