उत्तमोत्तम नाट्यागीते-उत्कट आविष्काराचा मिलाफ रसिकांनी अनुभवला
लोकमान्य को-ऑप. सोसायटी-‘तरुण भारत’च्या पुढाकाराने ‘आनंदमठ’ कादंबरीवर आधारित नाट्याप्रयोग
बेळगाव : बंड किंवा उठाव केल्याशिवाय स्वातंत्र्य किंवा न्याय मिळत नाही, हे वास्तव आहे. आपल्या देशाला अशा बंडांची आणि उठावाची, आंदोलनाची मोठी परंपरा आहे. त्यातीलच एक बंड म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध बंगालमधील संतान यांनी केलेला उठाव होय. हे संतान म्हणजे स्वत:ला भारतमातेचे संतान समजतात आणि ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध मोठे बंड करून विजय मिळवतात. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अनेक लेखकांनी आपल्या लेखनामधून नकळत का होईना जनतेला उठाव किंवा बंड करण्यास प्रवृत्त केले. याच परंपरेतील एक महत्त्वाची कादंबरी म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘आनंदमठ’. आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळाले.
परंतु, आज पुन्हा एकदा अनेक दुष्य प्रवृत्ती, अन्याय-अत्याचारांविरुद्ध उठाव किंवा बंड करण्याची गरज तीव्रतेने भासत आहे. या पार्श्वभूमीवर ‘आनंदमठ’ कादंबरीवर आधारित नाटक महत्त्वाचे ठरते. विनिता तेलंग यांनी या ऐतिहासिक घटनेवर नाटक लिहिले असून, रविंद्र सातपुते यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. लोकमान्य को-ऑप. सोसायटी व ‘तरुण भारत’ यांच्या पुढाकाराने या नाटकाचा प्रयोग गुरुवारी बेळगावमध्ये झाला व उत्तमोत्तम नाट्यागीते, तितकाच उत्कट आविष्काराचा मिलाफ रसिकांना अनुभवता आला. बंगालमधील भीषण दुष्काळामध्ये पदचिन्ह हे गावसुद्धा सापडले आहे.
त्या दुष्काळ परिस्थितीतसुद्धा ब्रिटिश राजवटीचा तत्कालिन प्रमुख वॉरन हेस्टींग्ज शेतसारा वसुलीचे सत्र निरंतर सुरू ठेवतो. अन्नपाणी नसताना तडफडून मरणारे लोक व ब्रिटिश राजवटीकडून होणारे दमन या विरोधात तेथील संन्याशी बंड करून उठले. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील हा पहिला उठाव. त्यावर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘आनंदमठ’ कादंबरी व त्यांनीच वंदे मातरम् स्फूर्तीगीतही लिहिले. पदचिन्ह गावातील सरदार महेंद्रसिंह लोकांना जमेल तेवढी मदत करतो. परंतु, शेवटी त्यालाही शरण व्हावे लागते.
पत्नी व मुलीसह तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतो. मात्र, जंगलात पाणी आणायला गेला असता भुकेमुळे हिंस्र झालेले लोक मुलगी हे खाद्य म्हणून आक्रमण करतात. परंतु, मठाधीपती सत्यानंदचे सहकारी त्यांना वाचवतात. जिवानंद कल्याणीच्या मुलीला आपल्या बहिणीकडे सोपवतो. त्याचवेळी त्याची पत्नी शांती तेथे येते आणि आपल्याला एकटीला सोडून गेलेल्या पतीची याचना करते. पुढे महेंद्रसिंह म्हणजेच जिवानंद संतान होण्याचा निर्णय जाहीर करतो. तेव्हा त्याची पत्नीसुद्धा पुरुष वेश धारण करून लढ्यात उतरते. इकडे भवानंद कल्याणीला आपल्या घरी येऊन येतो. कारण त्याला तिचा मोह पडतो. महेंद्र जेव्हा परततो, तेव्हा त्याला आपली मुलगी जागेवर नसल्याचे दिसते. त्याला सत्यानंद धीर देतात आणि अत्याचाराच्या विरोधात लढण्याची प्रेरणा देतात. हा लढा शस्त्रसज्जता नसतानासुद्धा संतान यशस्वी करतात आणि विजयी होतात.
नाटकाचा आशय समजण्यासाठी अनुभव घेणे महत्त्वाचे
नाटकाचा आशय पूर्ण समजण्यासाठी नाटकाचा अनुभव घेणे हे महत्त्वाचे. तथापि, सांघिकतेच्या पातळीवर हे नाटक मोठी उंची गाठते. किंबहुना हीच या नाटकाची जमेची बाजू आहे. नाटकातील प्रत्येक गायकाने सादर केलेली पदे श्रवणीय व तितकीच अर्थपूर्ण आहेत. प्रत्येक कलाकाराने आपले काम चोख बजावतानाच ते प्रभावी होईल, याची काळजी घेतली. त्यामुळे कोणी एक किंवा दोन नव्हे तर सर्वच कलाकार अभिनंदनास पात्र आहेत. यातील युद्धदृश्येसुद्धा प्रेक्षकांचा ठाव घेतात आणि प्रेक्षकांनाही स्फुरण चढते, हे महत्त्वाचे.
साथीदारांच्या वाद्यवादनाची कमाल प्रेक्षकांना अनुभवता येते. भारतमातेचे विरुप झालेले रूप आणि आपल्याला भारतमाता कशी पहावयाची आहे? हे दाखवणारा दृश्यात्मक प्रसंग दिग्दर्शक रविंद्र सातपुते यांच्या कल्पकतेची करामत दाखवतो. त्यांच्यासह जयंत टोले यांनी उभी पेलेली नेपथ्यरचना आणि प्रकाशयोजना नाटकाला अधिक प्रभावी करते. परितोष ठाकर यांचे पार्श्वसंगीत आणि अजय पराड यांचे संगीत प्रेक्षकांची सातत्याने दाद मिळवते. गायत्री चक्रदेव यांची वेशभूषा आणि अरविंद सूर्य यांची रंगभूषा नाटकाच्या यशस्वीतेसाठी पूरक ठरते.
ओंकार कपाल (सत्यानंद), बद्रीश कट्टी (जिवानंद), अनुष्का आपटे (शांती व नविनानंद), शर्व कुलकर्णी (महेंद्रसिंह), अनुजा जोशी (कल्याणी), वज्रांक आफळे (भवानंद), श्रीशैल शेलार (पूर्णानंद), संचिता जोशी (निमी आणि म्हातारी), प्रसाद कुलकर्णी (महापुरुष), अमित नगरकर (एडवर्ड), सिद्धांत गवारे (थॉमस), शार्दुल निंबाळकर (इंग्रज अधिकारी), ईशान जबडे (क्षिरानंद), पार्थ बापट (ज्ञानानंद) या सर्वांच्या सहज पण प्रभावी अभिनयाने हे नाटक प्रेक्षकांची दाद मिळवते. त्यांना अन्य कलाकारांची साथही महत्त्वाची. नाटकाचे सूत्रधार मिलिंद सबनीस आहेत. पुण्याच्या कोलाज क्रिएशन्सने हे नाटक रंगभूमीवर आणले आहे.
तरुणाईपर्यंत हे नाटक पोहोचण्याची नितांत गरज
इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा आणि मातृभूमीवर प्रेम करण्याची भावना जागृत व्हावी, हा या नाटकाचा हेतू आहे. तो साध्यही होतो. मात्र दुर्दैवाने पुन्हा पन्नाशीच्यावरील वयोगटच या नाटकाचा आस्वाद घेताना दिसतो. वास्तविक तरुणाईपर्यंत हे नाटक पोहोचण्याची नितांत गरज आहे. यातील भव्य आणि चित्ताकर्षक दृश्ये तरुणपिढीने पहावीत अशीच आहेत. तो हेतू साध्य झाला तर तीच या नाटकाची फलश्रुती ठरेल.
बेळगावच्या अनुष्का आपटेंची शांती अन् नवीनानंद अशी दुहेरी भूमिका
या नाटकामध्ये बेळगावच्या अनुष्का आपटे यांनी शांती आणि नवीनानंद अशी दुहेरी भूमिका वठवली आहे. संगीत राज्य नाट्या स्पर्धेतही त्यांच्यासह या नाटकाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. याशिवाय ऑर्गनवादक नेहा ताम्हणकर यासुद्धा बेळगावच्याच आहेत. ‘लोकमान्य’तर्फे या दोघींचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. तसेच अनुष्का यांचे वडील अॅड. अक्षय आपटे यांच्यासह सर्वांना व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आले. तेव्हा बेळगावकरांनी टाळ्यांच्या कडाकडाटात त्यांचे कौतुक केले.