पीकेएल 12 व्या मोसमासाठी मे अखेरीस लिलाव
वृत्तसंस्था/ मुंबई
मशाल स्पोर्ट्सने प्रो कबड्डी लीग 12 साठी खेळाडूंचा लिलाव होणार असल्याची घोषणा केली असून 31 मे ते 1 जून या कालावधीत हा लिलाव मुंबईत होणार आहे.
पीकेएल 11 मोसमाची यशस्वी सांगता झाल्यानंतर 12 व्या मोसमासाठी लिलाव होणार आहे. अकराव्या मोसमात हरियाणा स्टीलर्सने पहिल्यांदाच जेतेपद पटकावताना तीनवेळचे चॅम्पियन पाटणा पायरेट्सचा पराभव केला होता. डिसेंबर अखेरीस ही लढत झाली होती. पीकेएल लीगचा प्रवास 2014 पासून सुरू झाला आणि गेल्या अकरा वर्षात आठ विविध संघांनी जेतेपद पटकावलेले आहे. 11 व्या मोसमाची 18 ऑक्टोबर 2024 रोजी सुरुवात झाली आणि 29 डिसेंबरला जेतेपदाची लढत झाली होती. लोकप्रिय ठरलेल्या या लीगने दुसऱ्या दशकात पदार्पण केले आहे. त्यामुळे भारतातील एक प्रमुख क्रीडा लीग अशी त्याने ओळख निर्माण केली आहे. तसेच कबड्डी या देशी खेळाचीही प्रगतीही या लीगमुळे वाढीस लागली असून खेळाडूंनाही त्याचा फायदा झाला आहे.