सरकारी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा एमबीबीएस-इंजिनियरिंगकडे ओढा
पदवीपूर्व कॉलेजमध्ये सीईटी कोचिंगमुळे फायदा : पुढील वर्षी निकाल वाढण्याची शक्यता
बेळगाव : खासगी पदवीपूर्व कॉलेजना टक्कर देत सरकारी कॉलेजमध्ये सध्या विज्ञान विभागात सीईटी व इतर स्पर्धात्मक परीक्षांचे शिक्षण दिले जात आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात मागील वर्षी घेतलेल्या मेहनतीमुळे सरकारी कॉलेजचे अनेक विद्यार्थी इंजिनियरिंग व एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. बेळगाव जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी मागील वर्षी सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये सीईटी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. बेळगाव शहरातील जेल शाळा येथील सरकारी पदवीपूर्व कॉलेज, सरदार्स पदवीपूर्व कॉलेज, सरस्वती पदवीपूर्व कॉलेज व चिंतामणराव पदवीपूर्व कॉलेज येथे हे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात आले. खानापूर शहरातील एक व मुगळीहाळ येथील कॉलेजमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक अभ्यासक्रमासोबतच सीईटी तसेच नीटची माहिती देण्यात आली.
यापूर्वी सीईटी परीक्षेविषयी सरकारी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना तितकीशी माहिती मिळत नव्हती. त्यामुळे क्वचित एखाद दुसरा विद्यार्थी सीईटीची तयारी करत होता. परंतु सध्या मार्गदर्शन वर्ग सुरू झाल्याने सर्वसामान्य विद्यार्थीही सीईटीद्वारे इंजिनियरिंग तसेच नीट व जेईईद्वारे एमबीबीएससाठी प्रवेश घेत आहेत. खासगी तसेच अनुदानित शिक्षण संस्थांशी स्पर्धा करत सरकारी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. यावर्षी इंजिनियरिंगकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली तरी भविष्यात एमबीबीएससाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर्षी राज्यातील सरकारी कॉलेजमधील 46 विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळू शकला आहे. त्यामुळे भविष्यात ही संख्या वाढविणे गरजेचे आहे. मागील वर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी कमी कालावधी मिळाला. पुढील वर्षी निकालामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.
सीईटी मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना लाभ
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये एकूण 30 सरकारी पदवीपूर्व कॉलेज आहेत. यामध्ये सर्वसामान्य घरातील शेकडो विद्यार्थी अत्यंत माफक फीमध्ये शिक्षण घेत आहेत. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सीईटी, निट परीक्षांसाठी मार्गदर्शन केले होते. त्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांनी इंजिनियरिंग, एमबीबीएस व इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे.
- एम. एम. कांबळे (पदवीपूर्व जिल्हा शिक्षणाधिकारी)