For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

भारतीय उच्चायुक्तांवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न

06:22 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय उच्चायुक्तांवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न

कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांची पुन्हा आगळीक

Advertisement

वृत्तसंस्था/ ओटावा

कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांच्यावर खलिस्तान समर्थकांनी तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला कॅनडाच्या पोलिसांनी रोखला आहे. वर्मा हे 11 मार्च रोजी इंडो-कॅनेडियन चेम्बर ऑफ कॉमर्सकडून आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एडमोंटन येथे पोहोचले असता ही घटना घडली आहे. यादरम्यान खलिस्तान समर्थकांनी वर्मा यांच्या विरोधात अपमानास्पद घोषणाबाजी देखील केली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Advertisement

कॅनडात भारतीय दूतावासात काम करणारे अधिकारी मागील काही काळापासून  खलिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी भारतीय दूतावासाला लक्ष्य करण्याचे आवाहन केले होते. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची ब्रिटिश कोलंबियाच्या सरे येथे जून 2023 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरून भारत आणि कॅनडा आमने-सामने आले होते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येमागे भारतीय हस्तकांचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले होते.

Advertisement

कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न

11 मार्च रोजीच्या घटनेदरम्यान खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्त आणि भारताच्या विरोधात घोषणाबाजी केली. यादरम्यान एका खलिस्तान समर्थकाने भारतीय ध्वजाचाही अपमान केला. तसेच खलिस्तान समर्थकांनी तेथे आयोजित कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. 11 मार्च रोजीच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचे आवाहन करत पन्नूच्या समर्थकांनी पोस्टर्स जारी केली होती.  पोस्टर जारी झाल्यावर कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येत सुरक्षा जवानांना तैनात केले होते. कडेकोट बंदोबस्तात भारतीय उच्चायुक्त आणि त्यांच्या पत्नीला कार्यक्रमस्थळी पोहोचविण्यात आले होते.

Advertisement
Tags :
×

.