अखेर आज ठरणार मुख्यमंत्री
केंद्राचे निरीक्षक मुंबईत दाखल - एकनाथ शिंदेंची नाराजी दूर ; चर्चेला सुरूवात
प्रतिनिधी/ मुंबई
भाजपप्रणित महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. मात्र दहा दिवस उलटून गेले तरीही महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालेले नाही. महाराष्ट्राच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवार, 5 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी बुधवार दि. 4 रोजी पेंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारीच मुख्यमंत्र्यांचे नावही जाहीर होण्याची अपेक्षा आहे. याच कारणास्तव भाजपचे पेंद्रीय निरीक्षक अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे सत्तास्थापनेच्या हालचाली अधिक गतिमान झाल्या असून राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा चेहराही स्पष्ट होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीत ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री हा 1995 पासूनचा अलिखित नियम आहे. या नियमाला बगल देत महायुतीचा मुख्यमंत्री निवडणुकीनंतर आणि तो परिस्थितीनुसार ठरविण्यात येईल, असे भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित असाच लागला. एक्झिट पोलचे अंदाज भाजपच्या विरोधात होते. मात्र प्रत्यक्षात भाजपच्या आणि महायुतीच्याच बाजूने निकाल लागले. महायुतीचे आणि विशेषत: भाजपचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले. त्यामुळे आमचे आमदार जास्त म्हणून आमचा मुख्यमंत्री असे भाजपने न म्हणता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ म्हणून भाजपला मोठे यश मिळाले. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा करण्यात आला. त्याला आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने संमती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संमती दिली. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आणि मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील, यावर शिक्कामोर्तबही झाले. पण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून दहा दिवस झाले तरीही मुख्यमंत्री नक्की कोण होणार याचा निर्णय झालेला नाही. दरम्यान पेंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पेंद्रीय निरीक्षक विजय ऊपानी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आज होणाऱ्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीकडे लागले आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सर्वकाही सुरळीत आणि सर्व संमतीने होईल : विजय रुपानी
सर्व संमतीने विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होईल. नावाची घोषणा करण्यापूर्वी पक्षश्रेष्ठींना कळविले जाईल त्यानंतर घोषणा होईल. आमच्या पक्षश्रेष्ठींनी तिन्ही घटक पक्षांशी चर्चा केलेली आहे. त्यामुळे यात काही अडचण नाही. सर्वकाही सुरळीत आणि सर्व संमतीने होईल.
नाराजी दूर, चर्चेला सुरूवात
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच त्यांची प्रकृतीही खालावली होती. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात दुरावा आल्याचे बोलले जात होते. दरम्यान महायुतीचा शपथविधी अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. अशातच शिंदे गटाच्या वतीने भाजपकडे चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मंत्रिपदांबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. उदय सामंतांनी शिंदे गटाचा प्रस्ताव फडणवीसांसमोर ठेवल्याची माहिती आहे. 23 नोव्हेंबरनंतर फडणवीस आणि शिंदे गटात झालेली ही पहिलीच बैठक आहे.
आझाद मैदानाची महायुतीच्या नेत्यांकडून पाहणी
मुंबईतील आझाद मैदानात महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे. या ठिकाणी महायुतीतील तीनही पक्षाच्या नेत्यांनी जाऊन मंगळवारी सकाळी पाहणी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ज्युपिटरमध्ये उपचार
विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात गफहमंत्रीपद आणि नगरविकास खात्याची मागणी त्यांनी केली होती. पण कोणत्याही परिस्थितीत भाजप शिंदे गटाला गृहमंत्रीपद देण्यास तयार नव्हते. दरम्यान ते साताऱ्यातील त्यांच्या गावी निघून गेले. तिथेच एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली आणि ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. त्यानंतर काल सायंकाळी महायुतीची बैठक होणार होती. मात्र शिंदेंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही बैठकही रद्द करण्यात आली. काल रात्री भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत जवळपास दीड तास चर्चा केली. यानंतर आज अनेक घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे गेल्या चार ते पाच दिवसांपासून आजारी असलेले एकनाथ शिंदे आता ‘अॅक्शनमोड’वर आले आहेत. शिंदे आज ठाण्यातील ज्युपिटर ऊग्णालयात दाखल झाले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या घशात संसर्ग झाला आहे. त्यांना सातत्याने ताप येतोय. त्यामुळे त्यांना अशक्तपणा देखील जाणवत आहे. त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी देखील वाढल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. या सर्व कारणास्तव त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तसेच त्यांची डेंग्यू आणि मलेरियाचीदेखील चाचणी करण्यात आली. ही चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर ऊग्णालयातून बाहेर पडले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनी माझी तब्येत चांगली होती. चेकअपसाठी आलो होतो. माझी प्रकृती उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर बैठकांचा सपाटा सुरू
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून निघाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांच्या वाहनांचा ताफा ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाला. 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाची आढावा बैठक मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. गेले 6 दिवस आजारपणामुळे शिवसेनेची बैठक पुढे ढकलण्यात आली होती. गुरुवारी होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी दाखल झालेल्या शिंदे यांना धडाधड निर्णय घ्यावे लागणार आहेत. एकनाथ शिंदे दोन दिवस शिवसेना आमदारांची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत कोणता आमदार मंत्री होणार, 5 डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ कोण घेणार, कोणाला कोणती खाती मिळणार याबाबत महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
अजित पवार दिल्लीत
राज्याच्या नव्या मंत्रिमंडळ स्थापनेचा मुहूर्त जवळजवळ निश्चित झाला असतानाच अजित पवार एकटेच दिल्लीत दाखल झालेत. महायुतीच्या नेत्यांची पेंद्रीय मंत्री भाजप नेते अमित शहा यांच्याबरोबर बैठक झाली असताना आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार दिल्लीत दाखल झाले. बुधवारी भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड होणार असताना आणि मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब होणार असताना अजित पवार दिल्लीत जाण्यामागे निश्चित कारण कोणते यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.