धावत्या रेल्वेत बलात्काराचा प्रयत्न
महिलेने रेल्वेच्या डब्यातून घेतली उडी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
हैदराबाद येथे एका 23 वर्षीय महिलेने रेल्वेतून उडी घेतली आहे, रेल्वेच्या डब्यात एका इसमाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने तिने हे पाऊल उचलले. पीडित महिलेवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
संबंधित महिला सिकंदराबाद स्थानकावरून मेडचलच्या दिशेने धावणाऱ्या एमएमटीएस (मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस)रेल्वेतून महिलांच्या डब्यात पीडिता एकटीच प्रवास करत होती. डब्यातील दोन महिला रेल्वेस्थानकावर उतरल्यावर एक साधारण 25 वर्षांचा इसम डब्यात शिरला आणि त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रतिकार करत रेल्वेच्या डब्यातून उडी घेतल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले आहे. रेल्वेतून उडी घेतल्याने ही महिला जखमी झाली होती. तिला काही लोकांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. संबंधित आरोपीला पुन्हा पाहिल्यास त्याला ओळखू शकेन असे महिलेने सांगितले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिलेच्या तक्रारीच्या आधारावर बीएनएसचे कलम 75 (महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचविण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे) आणि 131 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबधित महिला स्वत:च्या मोबाइल फोनचा डिस्प्ले दुरुस्त करविण्यासाठी मेडचल येथून सिकंदराबाद येथे आली होती. तर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.