Miraj Crime : मिरजेत खून प्रकरणातील आरोपींवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!
मिरजेतील रुग्णालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त
सांगली : मिरजेत आज दुपारी खळबळजनक घटना घडली. निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडगी यांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालय परिसरात खुनी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या तात्काळ आणि धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीसाठी दोन्ही आरोपींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असताना काही संशयित व्यक्ती त्या ठिकाणी दबा धरून होते. याचवेळी एका संशयिताने आरोपींकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हालचालीवर पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी आणि पीएसआय दत्तात्रय पुजारी यांनी तत्काळ लक्ष ठेवून त्याला पकडले. त्याच्याकडून रिव्हॉल्वर आणि कोयता जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या हल्ल्यात सहभागी असलेले इतर तीन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, पोलिसांनी तात्काळ परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. प्राथमिक तपासानुसार, एका आरोपीने आधी हल्ला करायचा आणि नंतर उरलेले तिघे सहभागी व्हायचे, असा कट होता. पण पोलिसांच्या वेळीच घेतलेल्या कारवाईमुळे संभाव्य रक्तपात टळला.
या घटनेनंतर मिरजेत मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी रुग्णालय परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.