Satara News : साताऱ्यात प्रेमविवादातून जीवे मारण्याचा प्रयत्न; मुख्य आरोपीला 5 वर्षांचा कारावास
साताऱ्यातील गंभीर गुन्ह्यावर कठोर शिक्षा
सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस ५ वर्षांची सक्तमजुरी व ३ हजारांचा दंड, तर दोन साथीदारांना १ वर्ष कारावास व २ हजाराचा दंड अशी शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वाघमारे यांनी सुनावली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, घटनेत, २७ ऑ क्टोबर २०१७ रोजी कोंडवे (नलवडे आळी) येथे नातेवाईकांतील प्रेमप्रकरणाच्या संशयावरून आधी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी फिर्यादी व जखमी विशाल इंगळे यांच्यावर हल्ला केला होता. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच लाकडी दांडके व लोखंडी गजाने डोक्यात वार करून इंगळे यांना गंभीर जखमी केले होते.
या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचाप्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वराज पाटील यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
या खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकील एम. एन. कुलकर्णी यांनी परिस्थितीजन्य पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षी व न्यायालयीन निर्णायांचा आधार घेत युक्तिवाद मांडला. न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपी योगेश कृष्णांत निंबाळकर यास भा.द.वि.स.क ३०७ अंतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी व ३ हजार दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद, तर संतोष यदु निंबाळकरव गणेश शंकर निंबाळकर यांना भा.द.वि.स.क ३२३ अंतर्गत १ वर्ष कारावास व २ हजार दंड, दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली.
या प्रकरणातील पैरवी अधिकारी महिला हवालदार शितल भोसले व तेजा तुपे तसेच तपासात सहभागी पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले व सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखालील कार्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी अभिनंदन केले आहे.