प्रभावी मंत्र्यांना हनिटॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न
सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांचा विधानसभेत गौप्यस्फोट : गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आश्वासन
बेंगळूर : कर्नाटकातील प्रभावी मंत्र्यांना हनिटॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी हनिट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी आपल्याला हनिटॅपमध्ये अडकविण्याचा दोन वेळा प्रयत्न झाला होता, असे उघड केले. त्यामुळे खळबळ माजली असून राजण्णा यांनी लेखी तक्रार दिल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे स्पष्ट केले.
गुरुवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी सहकार मंत्र्यांवर हनिट्रॅपचा प्रयत्न झाला आहे. लोकप्रतिनिधींना ब्लॅकमेल करणे ही वाईट प्रवृत्ती आहे. काही राजकीय पक्षांमध्ये असणाऱ्यांनी आपल्या आणि कुटुंबाच्या स्वार्थासाठी असे करणे योग्य नाही, अशी टिप्पणी केली. तेव्हा मंत्री के. एन. राजण्णा यांनी यत्नाळ यांनी हा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी मी बोलत आहे. माझ्यावर दोन वेळा हनिट्रॅपचा प्रयत्न झाला. मात्र, मी अडकलो नाही. केवळ मीच नव्हे, राज्यातीलच नव्हे तर राष्ट्रपातळीवरील 48 जणांच्या सिडी, पेनड्राईव्ह आहेत.
त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी. याविषयी गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार देईन, तपास करून या प्रकरणामागे कोण आहे, याचा शोध घ्यावा. जनतेलाही हे समजले पाहिजे, असे सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी, राजण्णा यांनी तक्रार दिल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देईन. या प्रकरणातून सत्यासत्यता बाहेर आलीच पाहिजे. असे सांगितले. याच दरम्यान, भाजप आमदारांनी ते 48 जण कोण? हनिट्रॅप कोणी केले? हे उघडपणे सांगा, अशी मागणी मंत्री राजण्णा यांच्याकडे केली. यावेळी भाजप आमदार मुनिरत्न यांनी देखील माझ्याविरुद्धचे प्रकरण सीबीआयकडे सोपवा, अशी भावनात्मक मागणी केली. मी चूक केली असेल तर फासावर चढवा. अशा रितीने कुणाचे जीवन खराब करणे आवश्यक आहे का?, असा सवालही उपस्थित केला.
मंत्री राजण्णा यांच्या मुलाकडूनही गौप्यस्फोट
मंत्री के. एन. राजण्णा यांचे पुत्र राजेंद्र यांनीही गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर हनिट्रॅपचा प्रयत्न झाला होता. मला अजूनही फोन येत आहेत. फोन करणाऱ्यांना मी तक्रार करणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. माझ्या वडिलांवर दोनवेळा हनिट्रॅपचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणाचा शक्य तितक्या लवकर तपास केला तर उत्तम. कोणत्या पक्षातील नेत्यांनी हे कृत्य केले आहे, हे तपासातून पुढे येईल, असेही राजेंद्र यांनी म्हटले आहे.