बिहार निवडणूक ‘चोरण्या’चा प्रयत्न
राहुल गांधी यांचा भारतीय जनता पक्षावर आरोप
भुवनेश्वर / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ‘चोरट्या’ मार्गाने जिंकली, त्याचप्रमाणे बिहारची विधानसभा निवडणूकही चोरण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. बिहारमध्ये नोव्हेंबरच्या उत्तरार्धात विधानसभा निवडणूक होत असून ती केंद्रात आणि बिहारमध्ये सत्ताधारी असणारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि दोन्हीकडे विरोधात असणाऱ्या विरोधी पक्ष आघाडीसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
राहुल गांधी शुक्रवारी ओडीशाची राजधानी भुवनेश्वर येथे पोहचले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर अनेक आरोप केले. महाराष्ट्रात गैरप्रकार करुन या पक्षाने विधानसभा निवडणूक जिंकली आहे. आता बिहारमध्येही याचीच पुनरावृत्ती करण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे. भारतीय जनता पक्षाच्या या कारस्थानात केंद्रीय निवडणूक आयोगही समाविष्ट आहे. निवडणूक आयोग ही घटनात्मक स्वायत्त संस्था आहे. तथापि, ती आज भारतीय जनता पक्षाची शाखा म्हणून काम करीत आहे. तथापि, आम्ही त्यांना तसे करु देणार नाही, अशीही मल्लीनाथी त्यांनी केली. हा आरोप गेल्या काही दिवसांमध्ये गांधी यांनी अनेकदा केला आहे. तसेच निवडणूक आयोगानेही या आरोपाला अनेकदा चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपले आरोप सिद्ध करुन दाखवा, असे आव्हानही आयोगाने विरोधी पक्षांना दिले आहे. तथापि, कोणत्याही विरोधी पक्षाने हे आव्हान अद्याप स्वीकारल्याचे दिसून येत नाही.
विरोधी पक्षांची बैठक
गुरुवारी विरोधी पक्षांची बैठक पार पडली. भारतीय जनता पक्षाला यावेळी बिहारमध्ये निवडणूक गैरप्रकार करु द्यायचे नाहीत, असे ठरविण्यात आले. भारतीय जनता पक्ष भारताच्या राज्यघटनेतून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द हटविण्याच्या प्रयत्नात गुंतला आहे, असा आरोप या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. या देशातील आदिवासी, दलित आणि युवक यांना आपल्या अधिकारांसाठी लढण्याचे शिक्षण घ्यावे लागणार आहे. त्यांचे अधिकार धोक्यात आहेत, अशीही टिप्पणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. काँग्रेसने भारतात 160 सार्वजनिक उद्योग स्थापन केले. तथापि, भारतीय जनता पक्षाने त्यांच्यापैकी 23 उद्योगांचे खासगीकरण केले. भारतीय जनता पक्षाच्या राज्यात ओडीशातील दलित आणि आदीवासी नष्ट होतील, असा आरोपही त्यांनी केला.
40 हजार महिला गायब
भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून ओडीशातील 40 हजार महिला गायब झाल्या आहेत, असाही दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मात्र, याचा पुरावा त्यांनी दिला नाही. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत महिला असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. दलित आणि आदीवासींवर अन्याय केला जात आहे, असे अनेक आरोप काँग्रेस नेते गांधी यांनी केले.