गोवा फॉरवर्डची गावडोंगरीतीलप्रचार बैठक बंद पाडण्याचा प्रयत्न
सर्व सोपस्कार करूनच आयोजन : पक्षाचा दावा
प्रतिनिधी/ काणकोण
पैंगीणमध्ये जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीचे वारे सध्या जोरात सुरू झाले असून गोवा फॉरवर्ड पक्षाने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे उमेदवार प्रशांत नाईक यांची गावडोंगरी पंचायत सभागृहात बोलाविण्यात आलेली बैठक सरकारी यंत्रणेचा वापर करून बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सर्व सोपस्कार पूर्ण करून आयोजित केलेली बैठक ठरल्याप्रमाणे या ठिकाणी घेण्यात आली, असे गोवा फॉरवर्डने म्हटले आहे.
या बैठकीला गावडोंगरी आणि खोतीगाव पंचायतीमधील जे कार्यकर्ते जमले होते त्याने स्थानिक आमदार आणि मंत्री रमेश तवडकर यांच्या पायाखालची वाळू सरकायला तर लागलेली नाही ना, असे उद्गार गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्षा तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी यावेळी काढले आणि बैठक पुढे सुरू केली.
या बैठकीचे आयोजन करताना पंचायत, पोलिस, मामलेदार या सर्वांची अधिकृत परवानगी घेण्यात आली असताना अकस्मात बैठक चालू असताना काणकोणचे पोलिस निरीक्षक हरिश रा. देसाई यांनी अन्य पोलिसांना घेऊन बैठक रद्द करण्याचा इशारा दिला, असा दावा पक्षाने केला आहे. या बैठकीला गावडोंगरी आणि खोतीगावमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरीही नियोजित वेळेतच या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि त्यात विजय सरदेसाई, गावडोंगरीचे सरपंच धिलोन देसाई, माजी सरपंच अशोक वेळीप, गोवा फॉरवर्ड पक्षाचे मोहनदास लोलयेकर, उमेदवार प्रशांत नाईक, विकास भगत, गोवा फॉरवर्ड काणकोण गटाचे अध्यक्ष दत्ता वेळीप, माजी आमदार इजिदोर फर्नांडिस, श्रीस्थळचे पंच दशरथ गावकर यांची भाषणे झाली. गावडोंगरी आणि खोतीगावमधील 500 पेक्षा अधिक कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.
‘राजकीय दबावाखाली घडलेला प्रकार’
बैठक अकस्मात बंद करण्याचा सगळा प्रयत्न राजकीय दबावाखाली झालेला असून यामागे काणकोणचे आमदार तथा मंत्री रमेश तवडकर यांचा हात आहे, असा स्पष्ट आरोप आमदार विजय सरदेसाई आणि उमेदवार प्रशांत नाईक यांनी केला आहे.