For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगावात शांतता बिघडविण्याचा प्रयत्न

11:09 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगावात शांतता बिघडविण्याचा प्रयत्न
Advertisement

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : उचगाव येथे काही विघ्नसंतोषी संघटनांकडून भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेकायदेशीरपणे इतर महापुरुषांच्या मूर्ती बसविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशा संघटनांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रा. पं. तर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. येथे संगोळी रायण्णांचा पुतळा बसविण्यासाठी एक वर्षापासून काही संघटना प्रयत्न करत आहे. गावात सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने असताना बाहेरील गावच्या काही संघटना गावामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या संघटनांचा तात्काळ बंदोबस्त करावा व पुतळा व फलक यावरून शांतता भंग करू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.यापूर्वीही गावात बेकायदेशीरपणे फलक लावला होता. याला ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे ग्रा. पं. ने पोलिसांच्या सहकार्याने तो फलक हटविला. असे असले तरी काही विघ्नसंतोषी संघटनांकडून पुतळा बसविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

ग्रा. पं. कडे पुतळा बसविण्यासाठी निवेदनही देण्यात आले आहे. त्यानुसार ग्रा. पं. मध्ये यावर चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकारच्या उच्च न्यायालयाच्या दि. 18-1-2013 च्या आदेशानुसार यापुढे सार्वजनिक ठिकाणी पादचारी रस्त्यांवर अथवा त्याच्या आसपास तसेच सार्वजनिक ठिकाणी मूर्ती बसविण्यास अथवा फलक बसविण्यास राज्य सरकारने परवानगी देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सरकारी व सार्वजनिक ठिकाणी मूर्ती बसविण्यास परवानगी देण्यात येणार नाही असे ठरवून अर्ज निकालात काढला आहे. या विषयाचे भांडवल करत सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्थेला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी योग्य ती कारवाई करावी, संबंधित खात्याला याबाबत सूचना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, यादो कांबळे, गजानन नाईक, हनुमंत बुवा, दत्ता बेनके, जावेद जमादार, बंटी पावशे, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.