पंधरा वर्षांच्या युवतीला जाळण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था / भुवनेश्वर
ओडीशा राज्याच्या पुरी जिल्ह्यात एका खेडेगावात एका 15 वर्षांच्या युवतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेत ही युवती गंभीररित्या भाजली असून तिच्यावर उपचार केले जात आहेत. तिची स्थिती नाजूक असल्याची माहिती देण्यात आली. तिच्यावर ज्वालाग्रही पदार्थ टाकून आग लावण्यात आली अशी माहिती पुरी पोलिसांनी दिली आहे. ही घटना बायाबार खेड्यात घडली. शनिवारी दुपारी ही युवती आपल्या मित्राच्या घरी जात असताना, तिला तीन गुंडांनी अडवून तिच्यावर हल्ला केला. तिला जखडून तिच्यावर पेट्रोल ओतण्यात आले आणि पेटविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ओडीशा सरकारने या घटनेची गंभीर नोंद घेतली आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगाने प्रयत्न केल्याने दोघांना अटक करण्यात यश आले आहे. या युवतीचे वय 16 असून तिच्या उपचारांचा खर्च प्रशासनाकडून उचलला जाईल. तिला वाचविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील. ओडीशाच्या उपमुख्यमंत्री पार्वती परीदा यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून पिडीतेला न्याय देण्यासाठी वेगाने तपास करण्याचा आदेश त्यांनी पोलिसांना दिला आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.