दोन बंद घरे फोडण्याचा महालक्ष्मीनगरात प्रयत्न
चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र सुरूच : उपनगरातील घरे चोरट्यांचे लक्ष्य
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. लक्ष्मीटेकडीजवळील महालक्ष्मीनगर परिसरात दोन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर या घटना घडल्या असून दोन्ही घरांमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. चोरीसाठी आलेल्या तीन चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून फुटेजवरून त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास महालक्ष्मीनगर पाचव्या क्रॉसमधील शेखर तेनगी व सातव्या क्रॉसवरील पुरुषोत्तम प्रभू यांची बंद घरे फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. दोन्ही कुटुंबीय घरात नव्हती. यामुळे दोन्ही घरांना कुलूप लावण्यात आले होते. हीच संधी साधून एका त्रिकुटाने घर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
मध्यरात्री बंद घरे फोडणाऱ्या तीन चोरट्यांची छबी सीसीटीव्ही
कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खासकरून उपनगरातील बंद घरे चोरट्यांचे लक्ष्य बनत आहेत. महालक्ष्मीनगर परिसरात यापूर्वीही अनेकवेळा चोऱ्या, घरफोड्या झाल्या आहेत. परिसरात गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.