न्यू गुड्सशेड रोडवरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न
खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अलर्ट मेसेज
बेळगाव : सांबरा रोडवरील एसबीआयचे एटीएम फोडल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री न्यू गुड्सशेड रोडवरील एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी एचडीएफसी बँकेचे अधिकारी संदीप गिडदेप्पा गिऱ्याप्पनावर, रा. सदाशिवनगर यांनी खडेबाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुनील सदानंद कोले (वय 59 रा. न्यू गुड्सशेड रोड) याला अटक करून नोटीस बजावून सोडून देण्यात आले. न्यू गुड्सशेड रोडवर एचडीएफसी बँकेचे एटीएम असून सदर एटीएम रात्रंदिवस सुरू असते.
चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
न्यू गुड्सशेड रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केलेल्या संशयितांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सदर सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन संशयिताचा शोध करत तातडीने संशयिताच्या मुसक्या आवळल्या. दारुच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.