120 क्षेपणास्त्रs, 90 ड्रोनद्वारे युक्रेनवर हल्ला
रशियाकडून आक्रमक पाऊल : युक्रेनला अमेरिकेकडून मोठी मंजुरी
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियाने युक्रेनवर आता मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. अलिकडच्या महिन्यांमधील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यांमध्ये उत्तर युक्रेनच्या सुमी शहरातील एका नऊ मजली इमारतीला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
सुमीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर 400 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तर बचाव पथक अद्याप इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहे. रशियाकडून नष्ट करण्यात आलेले प्रत्येक जीवन एक मोठी शोकांतिका असल्याचे युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेंको यांनी म्हटले आहे.
रशियाने या हल्ल्यांद्वारे युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. हिवाळ्यापूर्वी युक्रेनमधील वीजपुरवठा ठप्प करण्याचा प्रयत्न रशियाने चालविला आहे. रशियाने 120 क्षेपणास्त्रs आणि 90 ड्रोन्स प्रक्षेपित केले असून यात इराणकडून निर्मित शहीद ड्रोन आणि अन्य प्रकारची बॅलेस्टिक तसेच क्रूज क्षेपणास्त्रs सामील होती असे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी सांगितले आहे.
युक्रेनच्या वायुदलाने 210 हवाई लक्ष्यांपैकी 144 आकाशात नष्ट करण्यात आल्याचा दावा केला आहे. तर मायकोलाइवमध्ये एका ड्रोन हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत.
लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर शक्य
रशियाच्या हल्ल्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनला रशियाच्या भूभागात हल्ले करण्यासाठी अमेरिकेकडून पुरविण्यात आलेल्या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच वापर करण्यास मंजुरी दिली आहे. रशियाने कुर्स्क क्षेत्रात उत्तर कोरियाच्या हजारो सैनिकांना तैनात करत स्वत:ची सैन्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न चालविला असताना अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने रशियाच्या क्षेत्रात पाश्चिमात्य शस्त्रास्त्रांचा वापर करण्याची अनुमती दिल्याने युक्रेनला मोठे पाऊल उचलता येणार आहे.