दहशतवादाच्या नर्सरीवरच घाव
अमेरिकेच्या पत्रकाराकडून खुलासा
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर शहर हे दीर्घकाळापासून दहशतवादाची नर्सरी म्हणून ओळखले जात राहिले असल्याचा खुलासा अमेरिकन पत्रकार आणि वॉल स्ट्रीट जर्नलच्या माजी पत्रकार आसरा नोमानी यांनी केला आहे. डॅनियल पर्ल प्रोजेक्टच्या सह-संस्थापिका आसरा नोमानी यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवादी जाळ्याबद्दल कित्येक वर्षे वृत्तांकन केले आहे. त्यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला अत्यंत आवश्यक कारवाई ठरविले. बहावलपूर शहरात दशकांपासून दहशतवाद फैलावला जात होता असे त्यांनी म्हटले आहे.
या ऑपरेशनमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौय असगर मारला गेल्याचे वृत्त आहे. रौफनेच पत्रकार डॅनियल पर्ल यांचे अहपरण करत बहावलपूरमध्ये हत्या केली होती. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूर समवेत 9 ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ल्याची माहिती मिळाल्यावर भारताने दहशतवादाच्या नर्सरीवर वार केल्याचे समजून चुकले असे उद्गार नोमानी यांनी काढले आहेत.
माझे मित्र आणि वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनियल पर्ल हे डिसेंबर 2001 मध्ये बहावलपूर येथे गेले होते. त्या काळी जनरल परवेज मुशर्रफ यांनी भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. तर पर्लने बहावलपूरमध्ये उघडपणे सुरू असलेली दहशतवादी संघटनांची कार्यालये आणि प्रशिक्षण तळांची माहिती जमविली होती असे नोमानी यांनी सांगितले.
बहावलपूरमध्ये खुलेआम दहशतवादी प्रशिक्षण
पर्ल यांना आरिफ नावाच्या व्यक्तीद्वारे मुलाखतीसाठी बोलाविले गेले होते, हा आरिफ हरकत-उल-मुजाहिदीनचा पीआर होता. पोलिसांनी आरिफला पकडण्यासाठी बहावलपूरमध्ये छापे टाकले होते, परंतु त्याच्या परिवाराने तो मृत्युमुखी पडल्याचे सांगत त्याची नकली अंत्ययात्राही काढली होती. नंतर पोलिसांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमध्ये त्याला पकडले होते. भारताने तेथेही दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत असे नोमानी यांनी म्हटले आहे.
आरिफने डॅनियल पर्ल यांना उमर शेखच्या स्वाधीन केले होते. उमर हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा ड्रॉपआउट आणि कट्टरवादी झाला होता. तो पाकिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घेत भारतात पर्यटकांचे अपहरण करायचा. त्याला 1999 मध्ये आयसी-814 विमानाच्या अपहरणारनंतर सोडण्यात आले हेते. त्याच्यासोबत मसूद अझहरला मुक्त करण्यात आले होते अशी आठवण नोमानी यांनी करुन दिली.
आयएसआयवर गंभीर आरोप
पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयने उमर शेखर आणि मसूद अझहरसारख्या दहशतवाद्याना आश्रय दिला आणि भारताच्या विरोधात अस्त्र म्हणून वापर केला. पाकिस्तानचे हेच धोरण आता त्याच्या नागरिकांना घातक ठरत आहे. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानही रक्तपात केला आहे. बेनझीर भुट्टो यांची हत्या, पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांची हत्या आणि 2014 मधील पेशावर स्कूल हल्ला याचे उदाहरण असल्याचे नोमानी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानने जबाबदारी टाळली
अमेरिकेने 1980 च्या दशकात मुजाहिदीन तयार केले होते असे म्हणत पाकिस्तान स्वत:चा बचाव करू शकत नाही. स्वत:च्या भूमीवरील दहशतवादी तळ संपविणे पाकिस्तानची जबाबदारी होती, परंतु त्याने असे केले नाही. कारण त्याचे पूर्ण धोरण काश्मीरवर कब्जा करण्याच्या अट्टाहासात अडकून पडल्याची टीका नोमानी यांनी केली.