For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला

06:45 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
मणिपूरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला
Advertisement

मोरेहमधील घटनेत दौघे हुतात्मा : एक महिलाही ठार : पोलीस चौकीवर बॉम्बफेक

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमधील मोरेह भागात बुधवारी (17 जानेवारी) सकाळी बंडखोरांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला केला. यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले असून कुकी समाजातील एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. हल्लेखोर कुकी समाजातील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या हल्ल्यात तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement

बुधवारी सकाळी मोरेहमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि बंडखोरांमध्ये चकमक झाली. सुरुवातीला मोरेह येथे सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी बॉम्ब फेकत गोळीबार केला. बंडखोरांनी तात्पुरत्या कमांडो पोस्टवर गोळीबार करण्याबरोबरच जवळच उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान केले. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना अटक केल्यानंतर 48 तासांनंतर ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. या नव्याने घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सध्या तेंगनौपाल जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

केंद्राकडे हेलिकॉप्टरची मागणी

मोरेहमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली आहे. गृह आयुक्त टी रणजीत सिंह यांनी गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांना पत्र लिहिले आहे. येथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. वैद्यकीय आणीबाणी कधीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे हेलिकॉप्टर देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आरोपपत्र दाखल

केंद्रीय तपास एजन्सी सीबीआयने 4 मे 2023 रोजी मणिपूर पोलिसांकडून शस्त्रे आणि दारूगोळा लुटल्याप्रकरणी बुधवारी 5 जणांविऊद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी, गुवाहाटी यांच्यासमोर आरोपपत्र सादर करण्यात आले. सीबीआयने जून 2023 मध्ये मणिपूर पोलिसांकडून (इंफाळ पूर्वेतील हिंगंग पोलीस स्टेशन) हे प्रकरण ताब्यात घेतले होते.

आतापर्यंत 200 हून अधिक मृत्यू

3 मे पासून राज्यात कुकी आणि मैतेई यांच्यात सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात 200 हून अधिक मृत्यू झाले आहेत. तर 1,100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 65 हजारांहून अधिक लोकांनी घरे सोडली आहेत. 6 हजार गुन्हे दाखल करण्यात आले असून 144 जणांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.