दक्षिण कोरियात विरोधी पक्षनेत्यावर चाकू हल्ला पोलिसांकडून हल्लेखोराला अटक
वृत्तसंस्था/ सोल
दक्षिण कोरियातील विरोधी पक्षनेते ली जे-म्यूंग यांच्यावर बुसान शहरात मंगळवारी जीवघेणा हल्ला झाला आहे. जे-म्युंग बुसान शहरात नव्या विमानतळाच पाहणी करत असताना आणि पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्या मानेवर एका इसमाने चाकूने वार केला. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून पोलिसांनी अद्याप त्याचे नाव जाहीर केलेले नाही.
हल्ल्यानंतर जे-म्यूंग यांना अग्निशमन दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे पुसान नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर हा 50-60 वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले, त्याने एक कागदी मुकूट परिधान केला होता ,ज्यावर ली असा उल्लेख होता.
हल्लेखोराने ली यांच्या नजीक पोहोचून त्यांच्याकडे स्वाक्षरीची मागणी केली होती. मग त्याने पुढे जात त्यांच्यावर हल्ला केला होता. हल्ल्यावेळी तेथे अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. हल्ल्यानंतर आरोपीला त्वरित ताब्यात घेण्यात आले आहे.
ली यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. सध्या त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया होणार असून त्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयी काही सांगता येणार असल्याचे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते क्वोन चिल-सेंय्ग यांनी म्हटले आहे.
अध्यक्षांकडून निंदा
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक यिओल यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. हल्लेखोराला माफ केले जाऊ शकत नाही. ली-म्यूंग याना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल असे यिओल म्हणाले. 2022 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ली यानी यून सुक यिओल यांना आव्हान दिले होते. ली हे अत्यंत कमी मतांनी निवडणुकीत पराभूत झाले होते. ली यांच्याविरोधात एका विकासप्रकल्पासाठी लाच घेतल्याचा आरोप असून याप्रकरणी खटला सुरू आहे.
अध्यक्षांच्या धोरणांच्या विरोधात उपोषण
ली यांनी 18 दिवसांपूर्वी अध्यक्ष यून यांच्या विदेश तसेच देशांतर्गत धोरणांच्या विरोधात उपोषण केले होते. उपोषणादरम्यान सोमवारी प्रकृती बिघडल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दक्षिण कोरियात पुढील वर्षी प्रतिनिधिगृहासाठी निवडणूक होणार आहे. दक्षिण कोरियात अनेक नेत्यांवर हल्ले झाले आहेत. ली यांच्यापूर्वी विरोधी पक्षनेते राहिलेले सोंग यंग-गिल यांच्यावर 2022 मध्ये हातोड्याने हल्ला झाला होता. तर माजी अध्यक्ष पार्क गेन-ह्ये यांच्यावर 2006 साली चाकूने हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती.