For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनआयए पथकावर पुन्हा पश्चिम बंगालमध्ये हल्ला

07:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
एनआयए पथकावर पुन्हा पश्चिम बंगालमध्ये हल्ला
Advertisement

वाहनांच्या काचा फोडल्या, दगडफेक : लाठ्याकाठ्या घेऊन अधिकाऱ्यांना रोखले

Advertisement

वृत्तसंस्था /कोलकाता

पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर भागात 2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) पथकावर शनिवारी सकाळी गावकऱ्यांनी हल्ला केला. एनआयए अधिकाऱ्यांच्या पथकाने दोघांना अटक केल्यानंतर त्यांची टीम कोलकाता येथे परतत असताना महिलांनी लाठ्याकाठ्या घेऊन त्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक लोकांनी एनआयएच्या वाहनाला घेराव घालत त्यावर दगडफेक केली. या संघर्षात एक अधिकारी जखमी झाल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या प्रकरणामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच एनआयए अधिकाऱ्यांनीच महिलांशी हुज्जत घातल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. आपल्या पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एनआयएने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारानंतर पोलीस दलाचा मोठा ताफा भूपतीनगर येथे पोहोचला होता. भूपतीनगर पोलीस स्टेशनच्या भगवानपूर 2 ब्लॉकच्या अर्जुन नगर ग्रामपंचायतीच्या नैराबिला गावात बॉम्बस्फोटाशी संबंधित प्रकरणात तपास चालू असताना एनआयए पथकावर हल्ल्याची घटना घडली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयएने या घटनेचा तपास हाती घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयए स्फोटाच्या घटनेचा तपास करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. शनिवारची घटना 5 जानेवारीच्या घटनेची आठवण करून देणारी होती. जानेवारी महिन्याच्या प्रारंभी उत्तर 24 परगणा येथील संदेशखाली भागात रेशन घोटाळ्याच्या संदर्भात छापेमारी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.