For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवसा मोबाईलवर हल्ला...रात्री बँक खात्यावर डल्ला

12:49 PM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिवसा मोबाईलवर हल्ला   रात्री बँक खात्यावर डल्ला
Advertisement

एपीके फाईल्सच्या माध्यमातून लूट : सरकारी योजनांची लिंक पाठवून सायबर गुन्हेगारांचा प्रताप : बेळगाव शहरासह जिल्ह्यात एक-दोन महिन्यांत 25 हून अधिक प्रकरणे

Advertisement

बेळगाव : पोलीस यंत्रणेला चकविण्यासाठी सायबर गुन्हेगार रोज नवनवीन क्लृप्त्या लढवत असतात. सध्या सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यातील रक्कम लुटण्यासाठी गुन्हेगारांनी नामी शक्कल लढविली आहे. दिवसा मोबाईल हॅक करायचा आणि मध्यरात्री त्या मोबाईलधारकांच्या बँक खात्यातून पैसे पळवायचे, असे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे सायबर क्राईम विभागाचीही डोकेदुखी वाढली आहे. याआधी बँक खात्यातून पैसे हडपण्यासाठी वेगळ्या मार्गांचा अवलंब केला जात होता. ‘तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते पुन्हा सुरू करण्यासाठी कार्डवरील क्रमांक सांगा’, ‘आम्हाला ओटीपी कळवा’, असे सांगत सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे काढायचे. आता ओटीपीची गरजच राहिली नाही. असे अनेक मार्ग सायबर गुन्हेगारांसमोर आहेत.

यापैकीच सध्या मोबाईल हॅक करून पैसे काढण्याचा सपाटा वाढला आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यात एक-दोन महिन्यांत 25 हून अधिक अशी प्रकरणे घडली आहेत. एपीके फाईल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपवर मेसेज पाठविले जातात. यापैकी कोणीतरी या मेसेजवर क्लिक केले की सहजपणे त्याचा मोबाईलच हॅक होतो. त्याच्या मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे येतो. खासकरून दिवसभरात गुन्हेगार मोबाईल हॅक करण्याचे काम करतात. अँड्रॉईड पॅकेज किट किंवा एपीके फाईल्स ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर येतात, त्या ग्रुपमधील अनेकांचे मोबाईल हॅक झालेले असतात. खासकरून ज्यांनी एपीके फाईल ओपन करून पाहिली आहे, त्यांचा मोबाईल हॅक झालेला असतो. दिवसा मोबाईल हॅक करून मध्यरात्री एकनंतर गुन्हेगार आपले काम सुरू करतात. तोपर्यंत ज्यांचा मोबाईल हॅक झालेला असतो, त्यांच्याविषयीची व त्यांच्या बँक खात्यांविषयीची सर्व माहिती जमवून ठेवलेली असते.

Advertisement

अकौंटमधील पैसे रात्रीच्या वेळी हडप 

ग्राहकांच्या बँक अकौंटमधील पैसे हडप करण्यासाठी रात्रीचीच वेळ का निवडली जाते? असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांसमोर पडला आहे. एखाद्याच्या बँक खात्यातून पैसे काढल्यानंतर त्याच्या मोबाईलवर मेसेज जातात. मध्यरात्री जास्तीत जास्त जण झोपेत असतात. कोणीही मेसेज बघायला जात नाहीत. म्हणून गुन्हेगार मध्यरात्रीची वेळ ऑपरेशनसाठी निवडतात, असे आढळून आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, गृहलक्ष्मी आदी सरकारी योजनांच्या नावे फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. सरकारी योजनांच्या नावेच एपीके फाईल्स पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे साहजीकच काही तरी नवी योजना असणार म्हणून लोक त्या फाईलवर क्लिक करतात. त्यानंतर सहजपणे त्यांच्या मोबाईलचा ताबा गुन्हेगारांकडे जातो. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक वेळेला दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये केंद्राकडून जमा केले जातात. राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते. ही गोष्ट लक्षात घेऊन गुन्हेगार फसवणुकीसाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या नावाचा वापर करू लागले आहेत. शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते. मात्र, ही रक्कम गुन्हेगार परस्पर हडप करीत आहेत.

तक्रार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. खासकरून अँड्रॉईड मोबाईलधारकांना टार्गेट करण्यात येत आहे. आयफोनधारकांपेक्षा अँड्रॉईड फोनधारकांचीच फसवणूक अधिक प्रमाणात होत आहे. सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने जागृती करूनही अनावश्यक लिंक क्लिक करून लोक फशी पडत आहेत. सावजांना ठकविण्यासाठी अश्लील छायाचित्रे किंवा अश्लील व्हिडिओंचाही वापर करण्यात येत आहे. सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ अपलोड केला जातो. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी क्लिक करा, असे लिहिलेले असते. व्हिडिओ पाहण्याच्या मोहापायी त्या लिंकवर क्लिक केले तरी मोबाईलचा ताबा सहजपणे सायबर गुन्हेगारांकडे जातो. सरकारी योजना, तरुणींची छायाचित्रे, अश्लील छायाचित्रे पाठवून या माध्यमातून एपीके फाईल्स पाठविण्यात येत आहे.

एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आलेल्या एपीके फाईल्स ग्रुपमधील कोणीतरी ओपन केल्या तर त्याच्या मोबाईलचा ताबा गुन्हेगारांकडे जातो. ती व्यक्ती किती व्हॉट्सअॅप ग्रुपवर आहे, त्या सर्व ग्रुपवर त्याच्या नावे एपीके फाईल्स पाठविल्या जातात. साहजीकच त्याचे आप्तेष्ट व मित्रपरिवारापैकी कोणीतरी उत्सुकतेपोटी त्या लिंकवर क्लिक करतात. अशा पद्धतीने फसवणुकीची चेन वाढत जाते. एपीके फाईल्स धोका वाढला आहे. गेल्या आठवड्यात पत्रकारांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एपीके फाईल्स पाठविण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी लगेच त्या ग्रुपवर संदेश पाठवून एपीके फाईल्सवर क्लिक करू नका, फसवणुकीसाठी ही फाईल पाठविण्यात आली आहे, असे सांगत त्यांनी ग्रुपमधील सगळ्यांना सतर्क केले.

प्रत्येकाने जागरुकता बाळगावी...

यासंबंधी जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांच्याशी संपर्क साधला असता एपीके फाईल्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. ही गोष्ट खरी आहे. अश्लील छायाचित्रे, मॅरेजकार्ड, तरुणींच्या छायाचित्रांआड एपीके फाईल्स पाठवून सावजांना ठकविण्यात येत आहे. आपल्याशी संबंधित नसलेल्या लिंकवर कोणीही क्लिक करू नये नहून फसवणूक ठरलेलीच आहे. फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येकाने जागरुकता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.

- पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर

Advertisement
Tags :

.