पाकिस्तानात जाफर एक्स्प्रेसवर हल्ला
अनेक जखमी, अनेक डबे घसरल्याने हाहाकार
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानच्या सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांच्या सीमारेषेवर, क्वेट्टा येथे निघालेल्या जाफर एक्स्पे्रस या रेल्वेवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात या गाडीची मोठी हानी झाली असून गाडीतील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हा हल्ला बाँबस्फोटांच्या स्वरुपात करण्यात आला असून स्फोटांच्या दणक्याने या गाडीचे अनेक डबे रुळावरुन घसरल्याने घबराट उडाल्याचे वृत्त आहे.
अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त प्राथमिक असून जीवीत हानीची नेमकी व्याप्ती अद्याप समोर आलेली नाही. हानीची मोजदाद अद्यापही केली जात आहे. हल्ला झाल्याचे वृत्त समजताच कराचीहून विशेष साहाय्यता दले घटनास्थळी धाडण्यात आली आहेत. त्यांनी बचावकार्याला प्रारंभ केला आहे. ऑगस्ट 2025 मध्येही याच भागात रेल्वेवर हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले होते. सप्टेंबर महिन्यातही जाफर एक्स्प्रेसवर असाच हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 12 जण जखमी झाले होते. गेल्या दोन महिन्यांमध्ये असे तीन हल्ले झाले आहेत.
एक डबा उलटला
रेल्वेवर पेलेल्या ताज्या बाँबस्फोट घटनेत जाफर एक्स्प्रेसचे 8 डबे घसरले असून एक डबा पूर्णपणे उलटला आहे. अपघाताचे दृष्य पाहता मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाली असल्याची शक्यता आहे, असे अनुमान प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची अद्याप पुरेशी माहिती दिलेली नाही. हानीसंबंधी केवळ मोघम वृत्त दिलेले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून येत्या काही दिवसांमध्ये चित्र अधिक स्पष्ट होईल अशी चर्चा आहे.
जाफर एक्स्पे्रस तीन वेळा लक्ष्य
गेल्या काही आठवड्यांमध्ये याच जाफर एक्स्पे्रसला तीन वेळा लक्ष्य करण्यात आले आहे. ही पाकिस्तानच्या विविध प्रांतांना जोडणारी महत्वाची गाडी आहे. तिच्यावर सातत्याने हल्ले करण्यात येत असल्याने प्रवाशांची सुरक्षा आणि वाहतूक यांच्यासंदर्भात अनेक महत्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या गाडीला सुरक्षा देण्याचे दडपण आता पाकिस्तानच्या प्रशासनावर येत आहे. प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप करण्यात येत असून पाकिस्तानातील विरोधी पक्षांनाही या घटनांवर आवाज उठविण्यास प्रारंभ केला. राष्ट्रीय विधिमंडळात या घटनांवर विशेष चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
बलुचिस्तान स्वातंत्र्यचळवळीशी संबंध
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात या देशाच्या प्रशासनाच्या विरोधात प्रचंड क्षोभ आहे. अनेक बंडखोर संघटना बलुची लोकांनी स्थापन केल्या असून त्यांना बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा करायचा आहे. त्यामुळे बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या भागांमध्ये नेहमी बंडखोरी होत असते. ही बंडखोरी दाबून टाकण्याचा प्रयत्न पाकिस्तान प्रशासनाकडून केला जातो. त्यामुळे बंडखोरी अधिकच वाढते. अलिकडच्या काळात अशा हल्ल्यांची संख्या बरीच वाढली आहे.