इस्रायली समर्थकांवर अमेरिकेत हल्ला
कोलोराडोमध्ये घटना : ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या घोषणा देत ज्यू जमावावर फेकले पेट्रोलबॉम्ब, गोळीबारही : अनेक जण जखमी
वृत्तसंस्था/ कोलोराडो
अमेरिकेतून बॉम्बस्फोटाची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील कोलोराडो राज्यातील बोल्डर शहरात एका संशयिताने ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या घोषणा देणाऱ्या लोकांवर हल्ला केला. या आगीत 8 जण भाजले गेले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये एक व्यक्ती मोलोटोव्ह कॉकटेल (पेट्रोल बॉम्ब) फेकताना दिसत आहे. हल्लेखोराने लोकांवर पेट्रोलबॉम्ब फेकल्याचे निदर्शनास आले आहे. अमेरिकन तपास संस्था एफबीआयने याला दहशतवादी हल्ला असे म्हटले आहे. हा हल्ला रन फॉर देअर लाईव्हज नावाच्या गटाच्या मेळाव्यादरम्यान झाला. हा गट गाझामध्ये हमासने बंदिवान ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेची मागणी करत होता.
अमेरिकन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी कोलोराडो येथील बोल्डर येथे ज्यू लोकांवर गोळीबार करत ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या घोषणा देण्यात आल्या. घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण बाजारपेठ परिसर रिकामा केला. सुरक्षा दलांनी रस्त्यांवर गस्त वाढवत लोकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले. या हल्ल्यात 67 ते 88 वयोगटातील लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. शांततेत निदर्शने करणाऱ्या लोकांवर हा हल्ला करण्यात आला. हल्ला झालेल्यांच्या जखमांवरून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते असे बोल्डर पोलीस प्रमुख स्टीव्ह रेडफर्न म्हणाले. तथापि, सध्या कोणताही निष्कर्ष काढणे खूप घाईचे होणार असल्याचेही ते म्हणाले. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
संशयित ताब्यात
पोलिसांनी घटनास्थळावरून एका पुरुष संशयिताला अटक केली आहे. आरोपीची ओळख 45 वर्षीय मोहम्मद साबरी सोलिमान अशी झाली आहे. सोलिमानने यापूर्वी अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केला होता. 2005 मध्ये सोलिमानला अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी व्हिसा नाकारण्यात आला होता. तथापि, तो अमेरिकेत कधी आणि कसा आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
...हा दहशतवादी हल्ला : एफबीआय
अमेरिकन तपास संस्था एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी याला ‘लक्ष्यित दहशतवादी हल्ला’ असे म्हटले आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे, हा हल्ला वैचारिक द्वेषाने प्रेरित दहशतवादी घटना असल्याचे दिसते. पुरावे स्पष्ट झाल्यावर आम्ही संपूर्ण माहिती देऊ, असे एफबीआयचे उपसंचालक डॅन बोंझिनो यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी, कोलोराडोचे अॅटर्नी जनरल फिल वेसर यांना लक्ष्यित गटाचा विचार करता हा हल्ला ‘द्वेषपूर्ण गुन्हा’ असल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट केले.
19 वर्षीय मुलीने केले घटनेचे कथन
बोल्डर घटनेची साक्षीदार असलेल्या कोलोरॅडो विद्यापीठातील 19 वर्षीय विद्यार्थिनी ब्रुक कॉफमनने या हल्ल्याची माहिती दिली आहे. आपण चार महिला जमिनीवर पडलेल्या किंवा बसलेल्या पाहिल्या असून त्यांचे पाय जळालेले होते. तसेच एका महिलेच्या शरीराचा बहुतेक भाग गंभीरपणे जळाला होता आणि कोणीतरी तिला ध्वजात गुंडाळले होते, असेही तिने सांगितले.
गेल्या महिन्यात इस्रायली दुतावासातील दोन कर्मचाऱ्यांची हत्या
गेल्या महिन्यात 21 मे रोजी राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये इस्रायली दुतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुन्हेगाराने ‘फ्री पॅलेस्टाईन’ असे ओरडत दोघांनाही जवळून गोळ्या घातल्या होत्या. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. घटनेनंतर पोलिसांनी एलियास रॉड्रिग्ज नावाच्या आरोपीला अटक केली. 30 वर्षीय एलियास हा शिकागोचा रहिवासी आहे. अटकेदरम्यानही तो पॅलेस्टाईनला मुक्त करण्याच्या घोषणा देत होता.