अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला
इंडियानात मिळाला भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह
वृत्तसंस्था/ शिकागो
अमेरिकेच्या शिकागोमध्ये एका भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला आहे. ही घटना 4 फेब्रुवारीला घडली असली तरी याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या विद्यार्थ्यावर 3 जणांनी हल्ला केल्याचे या व्हिडिओत दिसून येते. या तिन्ही आरोपींनी विद्यार्थ्याला मारहाण करत त्याचा फोन हिसकावून घेत पलायन केले होते.
या विद्यार्थ्याचे नाव सैयद मजाहिर अली असून तो हैदराबादचा रहिवासी आहे. तो मास्टर्सच्या पदवीसाठी अमेरिकेत गेला आहे. तर सैयदच्या पत्नीने विदेशमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून त्याला सर्वोत्तम उपचार पुरविण्याचे आणि तीन मुलांसोबत अमेरिकेत पाठविण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. मजाहिरवर जेवणासाठी घरातून बाहेर पडल्यावर हल्ला झाला होता.
तर दुसरीकडे इंडियाना प्रांतात एका पार्कमध्ये समीर कामत नावाच्या भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे. समीरने मास्टर्सचे शिक्षण पूर्ण केले होते, तो सध्या पीएचडी करत होता. त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व होते. यापूर्वी अमेरिकेत अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.