इक्वेडोरच्या अध्यक्षांवर हल्ला
500 लोकांनी वाहनताफ्याला घेरले : दगडफेक अन् गोळीबार : 5 जणांना अटक
वृत्तसंस्था/ क्वीटो
इक्वेडोरचे अध्यक्ष डॅनियल नोबोआ यांच्यावर बुधवारी कॅनार प्रांतात 500 हून अधिक लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यांच्या ताफ्यावर दगड फेकण्यात आले आणि वाहनाच्या दिशेने गोळीबार झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अध्यक्षांच्या कारवर गोळी लागल्याच्या खुणा दिसून आल्या असल्या तरीही नोबोआ यांना कुठलीच ईजा झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेनंतर 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अध्यक्षांच्या कारवर गोळी झाडणे आणि दगड फेकणे गुन्हा असून तो आम्ही सहन करणार नसल्याचे पर्यावरण आणि ऊर्जामंत्री इनेस मंजानो यांनी म्हटले आहे. तर अध्यक्षीय कार्यालयाने सर्व संशयितांच्या विरोधात दहशतवाद आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्याची घोषणा केली आहे.
इंधन अनुदान समाप्त
इक्वेडोरमध्ये इंधन अनुदान समाप्त करण्याच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शने होत आहेत. अध्यक्ष डेनियल नोबोआ यांनी सप्टेंबर महिन्यात डिझेल अनुदान संपुष्टात आणण्याचा आदेश जारी केला होता. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 1.1 अब्ज डॉलर्सची (सुमारे 9 हजार कोटी रुपये) बचत होईल, या रकमेतून छोटे शेतकरी आणि वाहतूक कर्मचाऱ्यांना भरपाई देण्यात येणार असल्याचे सरकारचे सांगणे आहे.
आदिवासी संघटना, शेतकरी संघटनांची भूमिका
डिझेल महागल्याने शेतीचा खर्च अन् वाहतूक खर्च वाढणार आहे. याचा गरीब आणि ग्रामीण समुदायांवर सर्वाधिक भार पडणार आहे. तर श्रीमंत आणि मोठे उद्योग याचा प्रभाव सहजपणे सहन करू शकतील असे आदिवासी संघटना आणि शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
आणीबाणी लागू
अनुदान संपुष्टात आणण्याच्या निर्णयाच्या विरोधात सुरू झालेल्या हिंसक निदर्शनांना नियंत्रित करण्यासाठी सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये आणीबाणी लागू केली आहे. इक्वेडोरच्या राष्ट्रीय आदिवासी महासंघाने पोलिसांच्या कारवाईला क्रूर ठरवत 5 निदर्शकांना मनमानी पद्धतीने अटक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. हा महासंघ मागील 2 आठवड्यांपासून डिझेल अनुदान हटविण्याच्या निर्णयाच्या विरोधात देशव्यापी संप करत आहे.
कायदा सर्वांसाठी समान : अध्यक्ष
हल्ल्याच्या काही तासांनी नोबोआ यांनी कुएंका शहरात विद्यार्थ्यांना संबोधित केले. जे लोक आम्हाला रोखू इच्छित होते, त्यांनी हल्ला केला, परंतु आम्ही घाबरणार नाही. नव्या इक्वेडोरमध्ये अशाप्रकारचे हल्ले सहन केले जाणार नाहीत. कायदा सर्वांवर लागू होईल असे नोबोआ यांनी म्हटले आहे.