Karad Crime : हजारमाचीत पैशासाठी सख्ख्या भावावर हल्ला!
हजारमाची परिसरात घरासमोर घडले तणावाचे प्रकार
कराड : कराडलगत हजारमाची परिसरात पैशावरून झालेल्या वादातून एका युवकाने आपल्या भावासह तिघांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली असून जखमी भावाने कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रम बबन सूर्यवंशी (वय ३५, रा. राजारामनगर हजारमाची, कराड) हे आपल्या कुटुंबासह घरी जेवण करत असताना त्यांचा लहान भाऊ ओंकार (वय ३०) घरी आला. त्याने विक्रम यांच्याकडे पैसे मागत शिवीगाळ व दमदाटी केली. ओंकारने घराच्या दरवाजावर लाथा मारून गोंधळ घातला. विक्रम सूर्यवंशी हे परिस्थिती शांत करण्यासाठी बाहेरआले असता ओंकारने घरासमोर पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस जोराचा मार केला. वाद शांत करण्यासाठी आलेल्या विक्रम यांच्या आई सुनिता व पत्नी किरण यांनाही ओंकारने हाताने मारहाण करीत शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
डोक्यातून रक्त येत असल्याचे लक्षात आल्यावर विक्रम यांनी आई, पत्नी आणि मेहुणा सनी विनोद टेवरे यांच्या सोबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात आले. विक्रम यांनी कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी तपास करत आहेत.