For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आटपाडीचा सचिन पॅरिसमध्ये चमकला

06:58 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
आटपाडीचा सचिन पॅरिसमध्ये चमकला
**EDS: IMAGE VIA @narendramodi ON WEDNESDAY, SEPT. 4, 2024** Paris: Athlete Sachin Khilari competes in the Men’s Shotput F46 event during the Paralympic Games 2024, in Paris. Khilari won a silver medal in the event with an Asian record distance of 16.32m. (PTI Photo)(PTI09_04_2024_000257B)
Advertisement

पॅरालिम्पिकमध्ये 40 वर्षानंतर गोळाफेक प्रकारात रौप्य :

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा रहिवासी असणाऱ्या सचिन खिलारीने पॅराऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकच्या सातव्या दिवशी सचिन खिलारीने पुरुषांच्या शॉटपुट एफ 46 प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. या रौप्यपदकासह, सचिन 40 वर्षांत पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या गोळाफेकमध्ये पहिले पदक जिंकले होते. शानदार कामगिरी करणाऱ्या सचिनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत खास अभिनंदन केले आहे.

Advertisement

बुधवारी स्पर्धेच्या सातव्या दिवशी 34 वर्षीय सचिनने 16.32 मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले व आपला आशियाई विक्रम मोडला. यंदाच्या वर्षी जपानमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. दरम्यान, कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने सुवर्णपदक जिंकले तर कांस्यपदक क्रोएशियाच्या बाकोविचला मिळाले.

या स्पर्धेत सचिन खिलारी, मोहम्मद यासर आणि रोहित कुमार असे तिघे भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये यासर व रोहित यांनी अनुक्रमे 14.21 मीटर आणि 14.10 मीटरच्या थ्रोसह 8 वे आणि 9 वे स्थान पटकावले. वर्ल्ड चॅम्पियन आणि एशियन गेम्स जिंकून पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आलेला सचिनने सर्व 6 वैध थ्रो केले, दुसऱ्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरीसह यश मिळवले. या स्पर्धेत भारताला 40 वर्षापूर्वी म्हणजेच 1984 मध्ये पदक मिळाले होते. यंदाच्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सचिनने या पदकांसह 40 वर्षापासून असलेला पदकाचा दुष्काळ संपवला.

अथक प्रयत्न अन् यशाला गवसणी

करगणी गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सचिनचा शाळेत असताना एक भीषण अपघात झाला होता. यावेळी त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. पण हार न मानणारा तो सचिन कसला. सुरुवातीला त्याने भाला फेकण्यास सुरुवात केली. परंतु खांद्याच्या दुखापतीनंतर त्यानं शॉटपुटचा पर्याय निवडला. हा बदल त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. सचिनने आजघडीला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे. आता, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत त्याने इतिहास रचला आहे.

गोळाफेकमध्ये तिसरे पदक

पॅरालिम्पिकच्या इतिहासात गोळाफेक प्रकारात पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी 1984 मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि दीपा मलिकने 2016 च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. यानंतर आता हे तिसरे पदक 8 वर्षांनंतर आले आहे.

सचिनचे पॅरालिम्पिकमधील थ्रो

पहिला प्रयत्न 14.72 मीटर

दुसरा प्रयत्न 16.32 मीटर

तिसरा प्रयत्न 16.15 मीटर

चौथा प्रयत्न 16.31 मीटर

पाचवा प्रयत्न 16.03 मीटर

सहावा प्रयत्न 15.95 मीटर.

प्रतिक्रिया

पॅरालिम्पिक 2024 मधील अतुलनीय कामगिरीबद्दल सचिनचे अभिनंदन! ताकद आणि दृढनिश्चयाचे शानदार प्रदर्शन करत पुरुषांच्या शॉट पुट एफ 46 स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. भारताला याचा अभिमान आहे.

                           पंतप्रधान नरेंद्र मोदी

400 मी शर्यतीत दीप्ती जीवनजीला कांस्य

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य करता येते. आव्हाने असतानाही खेळाडूंनी यशाची शिखरे गाठली आहेत. भारताची पॅराअॅथलिट दीप्ती जीवनजी अशा प्रेरणादायी खेळाडूंपैकी एक आहेत, जिचा प्रवास खडतर आव्हानांनी भरलेला होता, परंतु तिने कधीही हार मानली नाही. बुधवारी दीप्तीने महिलांच्या 400 मीटर टी20 इव्हेंटमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. पॅरा अॅथलीटने ही शर्यत 55.82 सेकंदात पूर्ण केली. जन्मत: बौद्धिक अंपग असलेल्या दीप्तीचे बालपण अतिशय खडतर गेले. अशा परिस्थितीतही हार न मानता पॅरिसपर्यंतचा प्रवास गाठणाऱ्या दीप्तीचा प्रवास रोमांचकारी असा आहे. 400 मी शर्यतीत कांस्यपदक जिंकल्यानंतर अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिकमध्ये नवा इतिहास, स्पर्धेच्या इतिहासात सर्वोत्तम कामगिरी

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरा अॅथलिटने 7 दिवसांत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरिसमधील स्पर्धेत 20 पदकांचा टप्पा गाठून भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवा इतिहास घडवला आहे. भारताच्या खात्यात आता एकूण 21 पदके आहेत. यामध्ये 3 सुवर्ण, 8 रौप्य आणि 10 कांस्यपदकांचा समावेश आहे. याआधी भारताने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण 19 पदके जिंकली होती. पण, आता पॅरिसमध्ये पहिल्या 6 दिवसातच भारतीय खेळाडूंनी नवा इतिहास रचला आहे.

भालाफेक, उंच उडीत भारताचा दुहेरी धमाका

भारतीय पॅरा अॅथलीट्सनी पुरुषांच्या उंच उडी आणि भालाफेक स्पर्धेत पदके जिंकून देशाचा गौरव केला. शरद कुमार आणि मरियप्पन थांगवेलू यांनी उंच उडीत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या उंच उडी टी 63 स्पर्धेत शरद कुमारने 1.88 मीटर उडी मारून दुसरा तर मरियप्पन थांगावेलूने 1.83 मीटर उडी मारुन तिसरा क्रमांक पटकावला.

याशिवाय, अजित सिंग आणि सुंदर सिंग गुर्जर यांनी पुरुषांच्या भालाफेक एफ 46 स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. अजितने 65.62 मीटर फेक करून दुसरे तर सुंदर सिंग गुर्जरने 64.96 मीटर फेक करून तिसरा क्रमांक पटकावला.

Advertisement
Tags :

.