Sangli Rain Update : माणगंगा दुथडी, पिंपरी खुर्द पूल पाण्याखाली, वाहून जाणाऱ्या जोडप्याला वाचविले
मान्सुनपुर्व पावसाने आटपाडी तालुक्यात दमदार हजेरी लावली.
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील माणगंगा नदीला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. सातारा जिल्ह्यातील पावसामुळे राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. माणगंगा गतीने प्रवाहित झाली आहे. गुरूवारी पहाटे आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द गावाचा माणगंगा नदीवरील पुल पाण्यात गेला.
पिंपरी खुर्दवरून सांगोला जाणाऱ्या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. मान्सुनपुर्व पावसाने आटपाडी तालुक्यात दमदार हजेरी लावली. मे महिन्यात फक्त उन्हाळी पावसाची सवय असलेल्या तालुक्यात संततधार पावसाने दैना उडविली. त्यातच टेंभु योजनेचे पाणी विविध भागातुन प्रवाहित झाले आहे.
टेंभु आणि पाऊस अशा दुहेरी स्त्रोतांमुळे तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आटपाडी शहरातील मुख्य पुल पाण्याखाली गेला होता. सातारा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे आटपाडी तालुक्यातील राजेवाडीचा ऐतिहासिक तलाव तुडुंब भरून नवा इतिहास घडला आहे.
राजेवाडी तलाव भरल्याने बुधवारी सकाळपासुन माणगंगा नदी प्रवाहित झाली आहे. तत्पुर्वी आटपाडी तलावातुन सांगोला तालुक्याकडे टेंभुचे पाणी याच माणगंगा नदीतुन सोडण्यात आले आहे. राजेवाडी तलावाच्या सांडव्यातुन पाणी गतीने प्रवाहित होत असल्याने आटपाडी ते सांगोला जोडणारा जवळचा मार्ग असलेल्या पिंपरी खुर्द पुलापर्यंत माणगंगा नदीपात्रात बुधवारी रात्री 11 वाजुन 40 मिनिटांनी पाणी पोहोचले.
पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पिंपरी खुर्द पुल पाण्याखाली गेला. आटपाडीहुन पिंपरी खुर्द मार्गे सांगोला जाणारी वाहतुक ठप्प झाली. आंबेवाडी, बोंबेवाडीला या मार्गाने जाणाऱ्यांचीही तारांबळ उडाली. दोन्ही बाजुच्या लोकांना कौठुळी, बोंबेवाडी, लोटेवाडी या रस्त्यांचा आधार घ्यावा लागला.
अनेकांनी धोका पत्करत पाण्यातुनच वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. सांगोला तालुक्यातील एक जोडपे पाण्यातुनच मार्ग काढत असताना पुलावर दुचाकी घसरली. सुदैवाने गार्डस्टोनला गाडी अडकली. उपस्थित तरूणांनी जोडप्याला आणि गाडीला सुरक्षीत बाहेर काढले.
पिंपरी खुर्द येथील तरूणांनी पुलावर अडकलेली लाकडी ओंडके, झाडे हटविण्याचे काम केले. पोलीसांनीही पुलाकडे धाव घेवुन सुरक्षतेबाबत दक्षता घेतली. माणगंगा नदीच्या या पुलावर सुमारे अडीच फुट इतके पाणी असल्याने वाहतुक ठप्प झाली.
नाझरे मठ येथे हायवेवर टोल नाका असल्याने मागील काही दिवसांपासुन पिंपरीमार्गे सांगोला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असुन या मार्गावर वाहनांची मोठी संख्या असते. या पुलावर पाणी असल्याची माहिती नसलेली मंडळी मात्र पुलाजवळ येवुन पुन्हा परतीचा रस्ता धरत होती. दरम्यान, माणगंगा नदीवरील पिंपरी खुर्द येथील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी युवक नेते मोहन जाधव व ग्रामस्थांनी केली आहे.
आटपाडी तालुक्यातील पर्जन्यमान
आटपाडी तालुक्यात गुरूवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत मे महिन्यातील विक्रमी पाऊस नोंदविला गेला. तालुक्यात 231 मिलीमिटर पाऊस झाला आहे. आटपाडी मंडलमध्ये 151 मिमी, दिघंची मंडलमध्ये 251 मिमी आणि खरसुंडी मंडलमध्ये 262 मिमी पाऊस झाला आहे.
सप्टेंबर 2020 मध्ये आटपाडी तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला होता. त्यावेळीही पिंपरी खुर्दसह अनेक पुल पाण्याखाली गेले होते. त्यानंतर चालुवर्षी ऐन उन्हाळ्यातच पावसाने कहर केल्याने पावसाळ्यापुर्वीच वरूणराजाचा रूद्रावतार अनुभवला जात आहे.