Atpadi Bajar Samiti : पेट्रोल पंपाच्या मीटरमध्ये फेरफारीचा घोटाळा, 18 लाखाचा अपहार
दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार, बाजार समितीची ग्वाही
आटपाडी : आटपाडी बाजार समितीच्या दिघंची येथील पेट्रोलपंपावर 18 लाख 45 हजाराचा अपहार झाला आहे. रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीला अंधारात ठेवून पंपाच्या मीटरमध्ये फेरफार करून घोटाळा केला आहे. हा अपहार बाजार समितीनेच उजेडात आणला असून दोषींवर कारवाईसाठी पोलीसांना पत्र दिल्याची माहिती सभापती, उपसभापती, संचालक व सचिवांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सभापती संतोष पुजारी, उपसभापती सुनिल सरक, संचालक सुबराव पाटील, राहुल गायकवाड, सचिव शशिकांत जाधव यांनी बाजार समितीच्या दिघंची येथील पेट्रोलपंपाच्या आर्थिक घोटाळ्याबाबतची माहिती दिली. 2021 मध्ये दिघंची येथे बाजार समितीतर्फे पेट्रोलपंप कार्यान्वित झाला.
तेव्हापासुन येथील कामकाज बाजार समितीच्या कर्मचाऱ्याकडूनच पाहिला जात होता. त्यानंतर या पंपावर रोजंदारीवर काम करणाऱ्यांना नियुक्त करून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. मार्च 2025 मध्ये पंपाच्या आर्थिक व्यवहाराचा हिशोब घेवुन पडताळणी केली असता त्यामध्ये गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले. पंपाचा मॅनेंजर विकास मोटे याने 6 लाख 89 हजाराची तफावत असल्याची कबुली दिल्याची माहिती सचिव शशिकांत जाधव यांनी दिली.
5 मे 2025 रोजी दिघंचीतील पेट्रोलपंपाच्या केबीनची काच फुटली. त्यावेळी पॅश जमा करण्यासाठी बाजार समितीचा कर्मचारी आम्ही पाठविला. त्यावेळी तेथे सेल्समन म्हणुन काम करणाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आणि पंपावरील घोटाळा उजेडात आला. सेल्समन यांनी मॅनेंजरकडे दिलेल्या हिशोबात आणि मिटर रिडींगमध्ये तफावत असल्याचे उजेडात आले.
बाजार समितीच्या दिघंचीतील पेट्रोलपंपावर मॅनेंजर, सेल्समन यांनी संयुक्तपणे 9510 लिटर डिझेल आणि 2600 लिटर पेट्रोल मिटरमध्ये फेरफार केल्याचे सिध्द झाले. मॅनेंजर मोटकडून बाजार समितीने खुलासा मागविला. आटपाडी पोलीस ठाण्याला पत्र देवुन सेल्समन धिरज रणदिवे, सुरज रणदिवे, दादा रणदिवे, महादेव शिंदे, किशोर जावीर, चैतन्य मुढे, तुषार गोंजारी यांनी संगनमताने मिटरमध्ये फेरफार करून अफरातफर केल्याचे मॅनेंजर विकास मोटे याने दुर्लक्ष केल्याने कारवाईचे पत्र दिल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले.
प्रारंभी 6 लाख 89 हजार आणि नंतर 11 लाख 56 हजार असा सुमारे 18 लाख 45 हजाराचा अपहार दिघंची पेट्रोलपंपावरील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाईसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिवांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सदर आर्थिक घोटाळ्यात रोजंदारीवरील किंवा बाजार समितीमधील नियमीत अधिकारी, कर्मचारी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, अशी ग्वाही सभापती संतोष पुजारी यांनी याप्रसंगी दिली.
चाळीस लाखांचा अपहार : दादासाहेब हुबाले
आटपाडी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या दिघंची येथील पेट्रोलपंपावर सुमारे 35 ते 40 लाख रूपयांचा अपहार झाला आहे. बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांनी हा अपहार उजेडात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचा बळी देण्याच्या हालचाली गतीमान केल्या आहेत.
त्यामुळे दिघंची पेट्रोलपंप अपहारप्रकरणी सचिव, सभापती व सत्ताधारी संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपने केली आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा आटपाडी बाजार समितीचे संचालक दादासाहेब हुबाले, माजी संचालक विष्णु अर्जुन, जयवंत सरगर यांनी पत्रकार परिषद घेवुन अपहाराचा आरोप केला.