अनियमित बसफेऱ्यामुळे अतिवाडच्या विद्यार्थ्यांचा ठिय्या
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
बेळगाव : बेळगाव-अतिवाड बसफेरीचे वेळापत्रक कोलमडले आहे. चालक-वाहक आपल्या मर्जीप्रमाणे बस गावापर्यंत नेत आहेत. या मनमानी कारभारामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव विभागाच्यावतीने परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. वेळेवर बस येत नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहनांनी शहर गाठावे लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांकडे बसपास असूनदेखील अधिकचे पैसे खर्च करावे लागत आहेत. विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचणे अवघड झाले असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने आसपासच्या गावापर्यंत पोहोचवून शहराकडे यावे लागत आहे.
बस वेळेत का येत नाही, याचे कारण परिवहन मंडळाने द्यावे, अशी शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी मागणी केली. तसेच संबंधितांवर कारवाई करून बसफेऱ्या वेळच्यावेळी सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांनी बसस्थानकामध्ये ठिय्या मारून अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी वेळापत्रकानुसार बसफेऱ्या सुरू केल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी प्रथमेश पाटील, सुमित कांबळे, समर्थ कांबळे, शुभम सुतार, हर्षद पाटील, अंकुश पाटील, विघ्नेश करकेरी, सुमित गावडे, दयानंद बाळेकुंद्री, ओमकार भोगण यांसह अतिवाड व बेकिनकेरे येथील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.