अॅथलेटिक्स स्पर्धा आजपासून
भारतीय अपेक्षांचा भार नीरज चोप्रावर
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्स स्पर्धा आज गुरुवारी येथे सुरू होणार असून भालाफेकपटू नीरज चोप्राच्या खांद्यावर मोठ्या यावेळी अपेक्षांचा भार असेल. भारताच्या 29 खेळाडूंच्या अॅथलेटिक्स तुकडीतील अन्य कमी ज्ञात नावेही त्याच्या यशाचे अनुकरण करण्याचे लक्ष्य ठेवतील.
एका त्रासदायक दुखापतीमुळे चोप्राला ऑलिम्पिकपूर्वी फार कमी स्पर्धांमध्ये भाग घेण्यास भाग पाडले आहे. असे असले, तरी हा स्टार भालाफेकपटू पदक आणि कदाचित अभूतपूर्व सलग दुसरे सुवर्णपदक जिंकण्याच्या बाबतीत सर्वांत भक्कम दावेदार आहे. चोप्राने 8 ऑगस्ट रोजी अव्वल स्थान मिळविले, तर तो ऑलिम्पिक इतिहासातील भालाफेकमधील विजेतेपद राखणारा केवळ पाचवा आणि ऑलिम्पिकमधील वैयक्तिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकणारा पहिला भारतीय ठरेल.
नीरजने यावर्षी फक्त तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला असला, तरी हा 26 वर्षीय विश्वविजेता फॉर्मात आला आहे. शिवाय त्याच्या अन्य कोणत्याही जागतिक स्पर्धकाने अपवादात्मक कामगिरी केलेली नाही. मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये 88.36 मीटर भालाफेक करून त्याने दुसरे स्थान पटकावले. ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे. चोप्राने 28 मे रोजी दुखापतीमुळे ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइकमधून माघार घेतली. त्यानंतर 18 जून रोजी फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये 85.97 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकून त्याने जोरदार पुनरागमन केले. मात्र जुलैमधील पॅरिस डायमंड लीगमध्ये तो उतरला नाही. पुरुषांच्या भालाफेकीतील अन्य भारतीय अॅथलीट किशोर जेनाने आशियाई क्रीडास्पर्धेत 87.54 मीटरच्या भालाफेकीसह ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविलेले असले, तरी त्यानंतर 80 मीटरचा टप्पा ओलांडण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला आहे. पुऊषांच्या भालाफेक स्पर्धेची पात्रता फेरी 6 ऑगस्ट रोजी होईल.
अॅथलेटिक्स स्पर्धेची सुरुवात पुरुष आणि महिलांच्या 20 किलोमीटर रेस वॉकने होईल. अक्षदीप सिंग, विकास सिंग आणि परमजितसिंह बिश्त हे पुरुषांच्या स्पर्धेत, तर प्रियांका गोस्वामी महिलांच्या स्पर्धेत भाग घेईल. तुकडीतील इतरांपैकी पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत अविनाश साबळे आणि पुरुषांच्या 4×400 मीटर रिले संघाकडे पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता आहे. ज्योती याराजी (महिलांची 100 मीटर हर्डल्स), पारुल चौधरी (महिलांची 3000 मीटर स्टीपलचेस), अन्नू राणी (भालाफेक), महिलांचा 4×400 मीटर रिले संघ, तजिंदरपाल सिंग तूर (गोळाफेक), तिहेरी उडीपटू प्रवीण चित्रावेल आणि अब्दुल्ला अबुबाकर हे किमान अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य निश्चितच बाळगू शकतात.