वयाच्या 38 व्या वर्षी वृद्धाश्रमात
ग्लॅमरमुळे आला होता वैताग
पूर्वी लोक आरामात स्वत:चे जीवन जगत होते, तर आता प्रत्येक काम धावपळ करतच करावे लागते. लोकांकडे स्वत:साठी तसेच स्वकीयांसाठी देखील वेळ नाही. अशास्थितीत या सर्व रहाटगाड्यापासून दूर जाण्याची इच्छा मनात उंचबळून येत असते.
चीनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत असेच घडले आहे. 11 वर्षांपासून ती ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करत होती. अखेर तिची स्थिती इतकी बिघडली की आता वयाच्या 38 व्या वर्षी ती वृद्धांदरम्यान त्यांच्यासारखीच जगत आहे.
मिस यांग नावाची महिली चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात 11 वर्षांपासून स्क्रीनरायटर म्हणून काम करत होती. प्रचंड काम आणि व्यग्र शेड्यूलमुळे हळूहळू तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला. अखेर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. स्वत:च्या जीवनात थोडा आराम करावा अन्यथा आणखी अधिक आजारी पडशील असे डॉक्टरांनी तिला सांगितले होते. याचदरम्यान तिच्या आईवडिलांचे निधन झाले आणि अन्य कुणी जवळचा नातेवाईक नसल्याने ती आराम अन् समाधानात राहता येईल अशा स्थळाचा शोध घेत होती.
अखेर तिने स्वत:साठी वृद्धाश्रमाची निवड केली. आजारी असल्याने मला येथे शांतता आणि आराम आणि वैद्यकीय देखभाल मिळू शकली. याचबरोबर वृद्धाश्रमाविषयी जाणून घ्यायचे हेते. 3 महिन्यांपर्यत मी 102 वृद्धांसोबत तेथे राहिले आणि तेथे मला जीवनाचा नवा दृष्टीकोन मिळाला. आता मी अत्यंत सावकाश वाचत, लिहित आणि इतरांशी संभाषण करत आनंद मिळवत आहे. आता मी स्वत:च्या भविष्याविषयी विचार करणेही सोडले असल्याचे ती सांगते.